कुर्ला : कुर्ला येथील सीएसटी रस्त्यावर असलेल्या कपाडीयानगरात गॅरेज आणि गोदामांना रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत चाळीसपेक्षा जास्त गोदाम आणि दुकाने खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.
कपाडिया नगर हे गॅरेज आणि वाहनांचे स्पेअरपार्ट मिळण्याचे ठिकाण म्हणून परिचित आहे. यामुळे इथे मोठ्या प्रमाणांत मोटार कार आणि दुचाकी दुरुस्तीसाठी येतात. स्पेयरपार्ट विक्री करणारे अनेक दुकाने आहेत. मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान यातील एका गॅरेजला आग लागली , ही आग पसरत तिने 30 ते 40 दुकाने कवेत घेतली.
आग इतकी भीषण होती की मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले. अग्निशमन दलाच्या सुमारे पंधरा वाहने पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवत होते. आगीचे कारण अद्याप स्पषट झाले नाही. महापालिकेने तत्काळ येथील अनधिकृत धंदे आणि गॅरेज बंद करावेत अशी मागणी होत आहे.