कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार! 'बस भरधाव आली अन् अनेकांना चिरडलं, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं'

Kurla Bus Accident | मुंबईतील कुर्ला बेस्ट अपघात : ७ ठार, ४२ जखमी, चालकाला अटक
Kurla BEST Bus Accident
मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर काल (९ डिसेंबर) भीषण अपघाताची घटना घडली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर (Kurla Bus Accident) काल (९ डिसेंबर) भीषण अपघाताची घटना घडली. सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने गर्दीच्या ठिकाणी घुसून पादचाऱ्यांना चिरडले आणि अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर ४२ जण गंभीर जखमी झालेत. या बसने १० वाहनांनाही धडक दिली. यामध्ये अनेक वाहनांचा चक्‍काचूर झाला. दरम्‍यान, बेस्ट बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याला आज कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) बस (रूट ३३२) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडकली. तसेच ही हाऊसिंग सोसायटीच्या भिंतीवर आदळली. ही घटना रात्री ९:४५ च्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदर बेस्ट बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात होती. यादरम्यान बसचे नियंत्रण सुटल्याने ती गजबजलेल्या ठिकाणी घुसली. यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. भिंतीला आदळून अखेर बस थांबली.

संजय मोरेला चालक म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का?

आरोपी संजय मोरेला चालक म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का? याची चौकशी होणार आहे. बेस्ट प्रशासनाशी बोलून याबाबत पोलीस पडताळणी करणार आहेत. तसेच बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि सबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. याआधी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता. पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai BEST bus crash : वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला

चालक संजय मोरे याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे. त्याचा वाहन चालवण्याचा परवाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चालक संजय मोरे हा १ डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे वय ५४ वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. संशयित आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यपान केले नसल्याचे समोर आले आहे.

Kurla Accident : बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा चालकाचा दावा ठरला फोल

दरम्यान, चालकाने दावा केला होता आहे की इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बसचे ब्रेक फेल झाले आणि वेग अचानक वाढला. पण चालकाने केलेला हा दावा फोल ठरला आहे. बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता अशी माहिती समोर आली आहे. चालकाला कोणतेही अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसताना त्याला चालक म्हणून कोणी रूजू करुन घेतले, याचा पोलिस आता तपास करत आहेत.

'बस कधी आली, कधी धडकली?, काही समजलं नाही', प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार

या अपघात झालेल्या बसमधून जवळपास ६० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. काही नागरिकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ''हा अपघात झाला तेव्हा काहीच कळाले नाही. कारण मी बाईक चालवत होतो. बाईक चालवत असताना अचानक मागून बसने जोरदार धडक दिली. ही धडक बसल्यानंतर मी गाडीवरून उडून खाली पडलो. माझ्या छातीच्या बरगड्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बस कधी आली, कधी धडकली, काही समजलं नाही. कारण हे खूप कमी वेळात घडले. हा अपघात झाल्यानंतर तेथील लोकांनी मला रुग्णालयात नेलं'', अशी माहिती एका अपघातग्रस्ताने पुढारी न्यूजशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news