मुंबई : शंकराचार्यांची भूमी असलेल्या केरळमध्ये समृद्ध धार्मिक परंपरा आहे. देशात हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील चार प्रमुख कुंभमेळ्यांप्रमाणे आता केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा 18 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 दरम्यान मलप्पुरममधील भरतपुळा नदीच्या काठावर होणार आहे. यामध्ये स्थानिक परंपरांना नवीन रूप दिले जाईल. केरळ प्रशासन स्वतःच या कुंभमेळ्याची तयारी करत असून त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू केली आहे
उत्तर भारतात सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी शंकराचार्यांनी आखाडा प्रणालीची स्थापना केली असे मानले जाते. त्याअंतर्गत कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. केरळमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी स्वागत समिती स्थापन करण्यात येणार आहे.
केरळमधील जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी आनंदवनम भारती यांनी येथील तिरुनवाय मंदिराला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, देशातील मोठी मठशाही आणि कुंभमेळ्यांचे आयोजन करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांपैकी एक असलेली जुना आखाडा संस्था या कुंभमेळ्याचे आयोजन करेल. हे फक्त धार्मिक आयोजन नाही तर आपल्या जुन्या परंपराना नवी ओळख देण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे केरळच्या परंपरेला नवा आयाम मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.