

कोपरखैरणे : कोपरखैरणेत रविवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सेक्टर 19 येथील झोपडपट्टी भागात झालेल्या या हाणामारीत तलवारी, कोयत्यासारखी शस्त्रे वापरण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात तीन जण गंभीर जखमी आहेत, तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत.
कोपरखैरणे सेक्टर 19 खाडी किनार्याला प्रचंड मोठी झोपडपट्टी वसली असून त्यात वाढही होत आहे. या अनधिकृत वस्तीत सर्व प्रकाराची दुकाने थाटली गेली असून गुन्हेगारांचा अड्डा म्हणून वस्ती ओळखली जाते. शहरातील अनेक गंभीर गुन्ह्यातील अनेक संशयित आरोपी याच झोपडपट्टीचा आसरा घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
याच ठिकाणी रविवारी रात्री जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत दोन गटात तलवारी, कोयत्याने वार करीत हाणामारी झाली. पोलिसांनी धाव घेत काही संशयितांना अटक केली. तीन संशयित जखमी असून एक फरार आहे.
सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास खाडी किनार्यावर एकविरा सर्व्हिस सेंटरच्या मागे राजेश जेजुरीकर आणि त्याचा मित्र उभे असताना तिथे हर्षद भोसले, गोरख म्हात्रे, राज राय, आणि इरफान शेख हे चौघे आले. त्यांचे आणि जेजुरीकर यांचे जुने वाद त्यांनी उकरून काढले.
काही कळण्याच्या आत लपवलेली तलवार आणि कोयता बाहेर काढून जेरुरीकरवर घाव घातले. त्याला वाचवण्यासाठी आलेला आकाश उर्फ पप्पू नवघणे याच्यावरही वार झाले. दोघेही रुग्णालयात आहेत. हर्षद भोसले, गोरख म्हात्रे आणि राज राय यांना अटक करण्यात आली आहे. तर इमरान शेख याचा शोध पोलीस घेत आहेत.