

मुंबई : मुंबई व महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, पुढील ५० वर्षांच्या पाणी नियोजनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय बैठकीत मांडण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना दरवर्षी तब्बल ६७ टीएमसी पिण्याच्या पाण्याचा नवीन साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुंबईच्या जल सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास मुंबईकरांना दरवर्षी ६७ टीएमसी शुद्ध पाणी मिळेल. प्रकल्पाच्या तांत्रिक व आर्थिक बाबी तपासून पुढील निर्णय होईल. समुद्रात वाया जाणारे हे शुद्ध पाणी भुयारी बोगदे व पाईपलाईनद्वारे मुंबईपर्यंत आणण्याच्या तांत्रिक शक्यतेचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. सध्या मुंबईसाठी नव्या जलस्रोताची आवश्यकता आहे. हा मार्ग व्यवहार्य ठरल्यास शहराच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडेल.
वीजनिर्मितीनंतर पाणी वाशिष्ठी नदीद्वारे समुद्रात
कोयना धरणाचे पाणी बोगद्याद्वारे आणून जनित्राद्वारे ४ टप्प्यांतून २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. पोफळी व कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे वीज जनित्रातून तसेच कोयना पायथा व कोळकेवाडी धरण पायथा येथे वीजनिर्मिती होते. राज्यात अतिउच्च विजेच्या मागणीवेळी हा प्रकल्प चालविला जातो. राज्यासाठी भाग्यलक्ष्मी ठरलेला कोयना प्रकल्प सकाळी व सायंकाळी पीक अवर्समध्ये चालवला जातो. त्यातून सोडले जाणारे पाणी वाशिष्ठी नदीद्वारे समुद्राला मिळते.