

मुंबई : महायुतीचे सरकार आल्यापासून उद्योगांच्या बाबतीत राज्यातील प्रत्येक विभागामध्ये समतोल राखण्यात आला असून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आली आहे. गडचिरोलीत स्टील क्षेत्रात 1 लाख कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटार वाहन क्षेत्रात 60 हजार कोटी आणि कोकणातील रत्नागिरीमध्ये व्हीआयटी सेमीकण्डक्टर (20 हजार कोटी) आणि धीरूभाई अंबानी डिपेैन्स सिटीमध्ये 10 हजार कोटी अशी एकट्या कोकणात 30 हजार कोटी रुपयांची गुंतवूणक झाली आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र उद्योग संवाद कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत बोलत होते. सामंत म्हणाले, कोकणमध्ये रायगड वगळता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंतवणूक येत नव्हती. पण गेल्या दोन वर्षात रत्नागिरीमध्ये 3500 कोटींचा कोकाकोलाचा प्रकल्प आला.
एका महिन्यात त्याचे प्रोडक्शन सुरू होणार आहे. सेमी कण्डक्टर व धीरूभाई अंबानी डिपेैन्स सिटीमध्ये कधी नव्हे इतकी रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे कोकणात 30 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात यशस्वी ठरलो आहोत. धीरूभाई अंबानी सिटीसाठी एक हजार एकर जागा तर व्हीआयटी सेमी कण्डक्टरसाठी 750 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कळंबोलीतही मोठे इनोव्हेटिव्ह सेंटर उभारले जात असून त्याला मुर्तस्वरूप आले आहे. आशिया खंडातील एमआयडीसीची सर्वात चांगली इमारत असावी यासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून एमआयडीसी आणि उद्योग विभाग हा जगात भारी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला नक्कीच यश येईल, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग परिषद, मैत्री पोर्टल, आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर अशा उपक्रमांद्वारे उद्योगवाढीचा पाया भक्कम केला आहे. मैत्री पोर्टलवरील 99 टक्के अर्जांची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील मर्यादा वाढवून मॅन्युफॅक्चरिंगसाठी 1 कोटी आणि सव्र्हिस सेक्टरसाठी 50 लाख रुपये करण्यात आले आहेत.
या कर्जांवर 17 टक्के सबसिडी देण्याचा निर्णयही घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये ओबीसी, दिव्यांग आणि अपंग घटकाचा समावेश केला असून सर्व सेक्टर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला जोडले आहेत आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील तरूणांना होत असल्याचा विश्वासही मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी दाओसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण 15.72 लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली असून, या कालावधीत 80 टक्क्यांहून अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरले आहेत. दावोसमध्ये करण्यात आलेल्या 46 सामंजस्य करारांपैकी 20 उद्योजकांना जागा दिली गेली असून ज्यांना जागा पसंत पडलेल्या नाहीत त्यांना पासथ्रू पद्धतीने जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आणखी 8 उद्योजकांना लवकरच जागा मिळणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत मागील तीन वर्षांत 52,000 उद्योजक तयार करण्यात आले, ज्यामधून 1 लाख 04 हजार नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. तसेच, स्थानिक जिल्हा उद्योग परिषद स्तरावर उद्योजकांनी 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून आणखी 1 लाख रोजगार निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.