Fishing News : कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांची उपासमार

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडचे मजूर परतीच्या वाटेवर
New fishing season rush
कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांची उपासमार pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मच्छीमार सहकारी संस्थांना किरकोळ बाजारभावापेक्षा 51 रुपये जादा दराने डिझेल पुरवठा केला जात असल्याच्या निषेधार्थ 20 मार्चपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद आहे. या व्यवसायावर अवलंबुन असलेल्या तब्बल 10 ते 12 लाख मजुरांची उपासमार सुरू असल्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील मजूर परतीच्या वाटेवर आहेत.

डहाणू, सातपाटी, वसई, उत्तन, वेसावे, मढभाटी, दांडा, वरळी, माहीम, भाऊचा धक्का, ससून डॉक, करंजा, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या समुद्र किनारी भागात सध्या 146 सहकारी मच्छीमार संस्था आहेत. या संस्थांना इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमकडून सवलतीच्या दरात डिझेल मिळते. सदर डिझेल हे संस्थांच्या माध्यमातून लहान - मोठ्या बोटींना वितरीत करण्याचे काम केले जाते. प्रत्येक बोटीला दरवर्षी 35 हजार 500 लिटर डिझेल दिले जाते.

तेल कंपन्याकडून किरकोळ ग्राहकांना 87 रुपये 47 पैसे प्रतिलिटर दराने डिझेल विक्री केली जाते. मच्छिमार संस्थांना मात्र प्रतिलिटर 90 रुपये 3 पैसे दराने डिझेल उपलब्ध केले जाते. आता आखाती युद्धाचे कारण सांगून 20 मार्चपासून 113 रुपये 11 पैसे प्रती लिटर दराने डिझेल घेण्यास सांगितले आहे. त्यामध्ये वाढ करून 141 नंतर 142 रुपये दराने डिझेल पुरवठा केला जात आहे. सेवा दिल्याच्या बदल्यात मच्छीमार संस्था 1 रुपया घेतात. बोटीला 143 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल खरेदी करावे लागतेे. हा दर परवडत नसल्याने कोकण किनारपट्टीमधील 9 हजार 747 बोटी किनाऱ्यालगत उभ्या आहेत.

तेल कंपन्यानी मच्छिमार संस्थांना डिझेल खरेदीसाठी मोठा खरेदीदार या वर्गात समाविष्ट केले आहे. या श्रेणीत औद्योगिक क्षेत्र, सरकारी यंत्रणा, पायाभूत प्रकल्प, विमान कंपन्या तसेच मोठ्या प्रमाणात इंधन वापरणाऱ्या व्यावसायिक घटकांचा समावेश आहे. या तुलनेत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था या केवळ वितरणाचे माध्यम असून प्रत्यक्ष लाभार्थी हे गरीब व पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यामुळे त्यांना या श्रेणीत समाविष्ट करून केंद्र सरकारने राज्यातील मच्छिमार बांधवांवर अन्याय केला आहे, अशी भावना मच्छीमार नेते रामदास संधे यांनी व्यक्त केली आहे.

7 एप्रिलला आंदोलन

गुजरातमधील मासेमारी बांधवांना तेथील सरकार किरकोळ दराने डिझेल पुरवठा करते. महाराष्ट्रात मात्र, आम्हाला मोठा खरेदीदार म्हणून या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. किरकोळ दर आम्हालाही लागू करावा, या मागणीसाठी 7 एप्रिल रोजी प्रत्येक बंदर आणि मासळी बाजारासमोर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहितीही संधे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news