मुंबई : अधिवेशन सुरू असताना सभागृहात चक्क रमी खेळताना आढळलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय तूर्त टळला आहे. मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री योगेश कदम यांच्या पाठिशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता मावळल्याने साहजिकच मंत्री कोकाटे यांना त्याचा फायदाच झाला आहे.
अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी त्यांच्यावर कारवाई करू नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य मंत्री आणि नेत्यांची भूमिका होती. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात रमी खेळणे गैर असले तरी हे वर्तन त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांचे खाते बदलावे असे नाही. त्यांच्यापेक्षा शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांची प्रकरणे अधिक गंभीर आहेत. त्यांना आयकर विभागाने नोटीस देखील बजावली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर आपण कोकाटे यांच्यावर कारवाई का करावी? असा मुद्दा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अजित पवारांकडे मांडला.
कोकाटे हे एक ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांना उशिराने संधी मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला आधीच पायउतार व्हावे लागले असताना माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई केली तर विरोधकांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे समज देऊन कारवाई टाळावी, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती. त्यावर अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी कोकाटे यांच्याशी केलेल्या चर्चेत समज देत कारवाई करण्याचा निर्णय टाळला, असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे मंत्र्यांना समज देत कारवाईच्या मागणीवर पडदा टाकण्यात आला आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीनंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना गाठण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. बैठक संपवून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आलेले कोकाटे यांना बोलते करण्यासाठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. मात्र, ते कोणाशीही बोलले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांची अजित पवारांसोबत बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी त्यांची कानउघडणी करताना माध्यमांशी बोलणे टाळण्याची सूचना केली. त्याप्रमाणे कोकाटे यांनी बोलणे टाळले.