Solar Agriculture Pump Scheme | 'मागेल त्याला सौर कृषीपंप'; असा करा 'या' योजनेसाठी अर्ज

'या' योजनेला उदंड प्रतिसाद; महिनाभरात १ लाख २२ हजार ४२१ अर्ज
Solar Agriculture Pump Scheme
'मागेल त्याला सौर कृषीपंप'; जाणून घ्या या योजनेसाठी अर्ज कसा करावा File Photo
Published on
Updated on

मुंबई: राज्य शासनाच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणची वेबसाईट सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत केवळ चौदा दिवसात १ लाख २२ हजार ४२१ शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर नावनोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

राज्य सरकारने 'मागेल त्याला सौर कृषी पंप' ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाईट तयार केली असून तिचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसात २७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १,२२,४२१ शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते.

जालना जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून ५२,०६७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (२४,५२६ अर्ज), परभणी (१५,०४३ अर्ज), छत्रपती संभाजीनगर (६,८८८ अर्ज) आणि हिंगोली (५,०७९ अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे सिंचन साधन मिळणार

या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेसाठी असा करा अर्ज

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावा. वेबसाईटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाईटवर तपासता येते.

'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेसाठी असा करा अर्ज
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेसाठी असा करा अर्ज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news