

मुंबई: शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या नावबदलाचा प्रस्ताव पुढे सरकला असून, ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नवे नाव देण्यास आरोग्य समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
किंग एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाची स्थापना 22 जानेवारी 1926 रोजी झाली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांच्या मनात हे नाव घट्ट रुजले असतानाच, आता या ऐतिहासिक संस्थेची नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, ‘स्वदेशी’ संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. वसाहतवादी काळातील नावांमुळे दास्याची आठवण होत असल्याने, त्याऐवजी भारतीय संस्कृती, मूल्ये आणि प्रेरणादायी इतिहास प्रतिबिंबित करणारी नावे देण्याचा आग्रह वाढत आहे.
याच अनुषंगाने मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 29 मार्च 2026 रोजी आरोग्य समितीकडे पत्र पाठवून केईएम रुग्णालयाचे नामांतर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.आता महापालिका प्रशासनाच्या अभिप्रायानंतर अंतिम निर्णय होणार असून, या नामांतरावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.