

मुंबई : ‘3-3-2025 को राजीनामा होगा’, अशी फेसबुक पोस्ट करत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राजीनामा दिला असून तो सोमवारी अधिवेशनापूर्वी मंजूर होणार, असेही त्यांनी म्हटले आहे.
मी 5 मार्चपासून धनंजय मुंडेंविरोधात उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी अशी माहिती दिली की, तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी तो राजीनामा सादर होणार आहे. धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते. पण, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी अधिवेशन सुरू होणार असून त्याआधी सगळ्यांसमोर राजीनामा दिल्याचे जाहीर होईल, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र त्यांनी ती अजून दिलेली नाही. पण अजित पवारांनी आधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. त्यांनी तो वेळीच न घेतल्याने पक्षाची प्रतिमा खराब झाली, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर ठीक, नाहीतर मी माझे पुढचे पाऊल काय असणार आहे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन, असा इशारा दिला आहे.