

The 'fruits' of merit and sin through actions are stored in the treasury of your God and ours.
मुंबई : कृष्णा जाधव
पुण्यामुळे देवयोनी मिळते; ही योनी सुखप्रधान पण तिथे मोक्ष ‘संधी’ नाही. मनुष्य योनीत पाप-पुण्य करण्याची निवड करता येते. विवेक जागृत ठेवून आत्मज्ञानाप्रत गेल्यास ‘मोक्ष’ हमखास. तिर्यक योनीत अज्ञान व आसक्तीच असते. अश्वत्थ वृक्षाने धारण केलेला हा संसार किती विस्तीर्ण, अफाट आणि विशाल आहे. या वृक्षाच्या फांद्या 84 लक्ष योनींनी बहरलेल्या असतात. या संसारवृक्षाचं रूप ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदांनी आणखी समृद्ध केलेले. यामधील ज्ञानार्जनाचं सामर्थ्य लाभण्यासाठी ‘संचित’ आवश्यक असते. गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी सुद्धा पुण्य करावे लागत. याविषयीच चिंतन ‘गतलेखात’ आपण केले. आजच्या लेखात अश्वत्थ वृक्षावरील रज-तम-सत्व गुणांच्या माध्यमातून मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहुया...
कर्मे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत देहाला संसार आणि देह जोपर्यंत आहे, तोपर्यंत कर्माचा व्यापार चालूच राहातो. हाच तुमचा आमचा खजाना कर्म हीच खरी दौलत. कर्मद्वारा पुण्याची आणि पापाची ‘फळ’ तुमच्या आमच्या देव भांडारात ठेवली जातात. दैनंदिन कर्मातून निर्माण होणार्या पापपुण्यांच्या राशीने आमची दौलतजादा वाढतच जाते. या कर्माची विभागणी रज-तम-सत्व गुणकर्म.
रजोगुण युक्त कर्म : रजोगुणांच्या रसामधून आमचे जीवन कार्य अश्वत्थ संसार वृक्षाच्या ठिकाणी बहरू लागत. मानवी जीवनातील अर्थ
(धन, संपत्ती, उपजीविका आणि काम (इच्छा, भोग, समाधान) यांचा रजोगुणांशी अतिशय जवळचा संबंध सांगितला आहे. रजोगुण म्हणजे क्रिया, ऊर्जा, प्रयत्न, आसक्ती, स्पर्धा, चित्ताची अस्थिरता, चंचलपणा याद्वारे माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात आपल्या कर्माद्वारे काहीतरी प्राप्त करून उपभोगायचं आहे. अर्थ आणि काम या दोन्ही पुरुषार्थांना प्रवाहीत ठेवणारी शक्ती म्हणजे रजोगुण.
1) अर्थ : धन, संपत्ती मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे आपले राहणीमान उंचावत उपजीविका चालवण्यासाठी माणूस परिश्रम, व्यापार, उद्योग, नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होतो. धन-संपत्ती मिळवण्यासाठी स्पर्धा, धावपळ, परिश्रम, उपाय, नियोजन इ. द्वारे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे रजोगुणाचे एक लक्षण आहे. अर्थसंपादन हे जर सत्वगुणाशी जोडले (नीती-धर्म मार्गयुक्त) तर ते समाजहितकारी व शुद्ध ठरते. पण जर रजोगुणात तमोगुण मिसळून (अनीती-अधर्म मार्ग) अर्थ, धनसंपत्ती कमवायचा प्रयत्न केला तर लोभ, भ्रष्टाचार, अन्याय, शोषण यांचा उदय होतो.
2) काम (इच्छा, भोग) : रजोगुणामुळे मनात इच्छा, वासना, सुखभोगांची ओढ निर्माण होते. प्रपंचातील सुखाची आसक्ती यामागे रजोगुणच असतो, सतत नवीन भोग, नवे आकर्षण, नवी प्राप्ती (कपडे, गाडी, घर, दागिने इ.) यासाठीची अहोरात्र धडपड ही रजोगुणी वृत्ती होच. इच्छा आणि भोग यांना विषयांची कमतरता नसते. सर्व इंद्रिये या पाठीमागे रात्रंदिवस अक्षरशः वेडपटासारखी धावत असतात. भोग आगि कामेच्छा यांना संयम आवरू शकतो. बुद्धीला वैराग्याची साथ मिळाल्यास ‘कामाचा’ कायमचा बंदोबस्त करता येतो. पण कामेच्छा, भोगेच्छा संयमित करता आल्या नाहीत तर मानवी जीवनात असंतोष, दुःख, राग, लोभ, व्यसन कामविकार हे शत्रू प्रवेश करून अक्षरशः ते नागवीतात. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी ‘धर्म’ सत्वगुणाशी संबंधित, अर्थ-काम-रजोगुणांशी संबंधित, तर ‘मोक्ष’ रज-तमाचा अतिक्रम (रोध) करून सत्वाच्या शुद्धतेतून साध्य होतो, म्हणजेच अर्थ व काम यांचेमुळे रजोगुणात आहे, यांच्यामुळे मानवी जीवनात शुभ-अशुभ कर्म घडून येतात. या कर्माच्या माध्यमातून जे पाप-पुण्यांच संचित निर्माण होते त्यालाच ‘प्रारब्ध’ म्हणतात. मानवी जीवनात रजाच्या (रजोगुण) माध्यमातून अर्थ, काम यांचा विस्तार होतो, काही सुखाचे अंकुरही जीवनात डोकावतात.
अर्थु कामु पसरे । अग्रवने घेती थारे।
तेथ क्षणिके पदांतरे। इहभोगाची ॥
तमोगुणाचे कार्य: अश्वत्थ संसार वृक्षाच्या ठिकाणी असलेली तमोगुण शाखा मानवी जीवनात कर्म रूपाने कार्य करत असते. चार पुरुषार्थापैकी एकही पुरुषार्थ वाट्याला न आलेला तमोगुण. याच्यापासून किमान चार हात दूर राहूनच जगलं पाहिजे. मानवी जीवनातील अत्यंत नीच, गलिच्छ वासना तमोगुणाच्या माध्यमातून निर्माण होतात. त्याद्वारे वाईट कर्मे हातून घडतात. असंख्य चुका हातून घडतात, जे करू नयेत ती सर्व कर्मे करण्याची बुद्धी तमोगुणांद्वारे निर्माण होते. अविचार, अधर्म, अनीती, भ्रष्टाचरण याच मार्गाने तमोगुणांकीत व्यक्ती करत जाते. इतरांना म्हणजे विश्वातील सर्व आजूबाजूच्या व्यक्ती, समाज, प्राणी, निसर्ग इ. यांना त्रास देण्यासाठीचे विचार तमोगुणांकित व्यक्तीच्या डोक्यात घोळत असतात व त्याचप्रमाणे ते वागतात. जारण-मारण-स्तंभन-मोहन-उच्चाटन-वशीकरण इत्यादी अविचारी कर्म करून सर्वांना त्रास देण्याची वृत्ती असते. तमोगुणी व्यक्तीच्या जीवनात ‘हिंसा’ आणि ‘विषयभोग’ या निषिद्ध कर्माचे सतत विचार स्मरत जातात. माऊली म्हणतात.
...आणि हिंसा विषयपुढारी। कुकर्मसंगे धुरधरी।
जन्मवरी आगारी। वाढतीची असे ॥
तमोगुणी व्यक्तीच्या हातून घडणारे कुकर्मे त्यांचे रूपांतर पापसंचयात होत जाते. पापाची फळे ही भोगावीच लागतात. अशा व्यक्तीचा पुढचा जन्म वृक्ष-वेली, दगड-माती, खनिजे यांच्या रूपाने घेऊन पापक्षालन करावे लागते. दुष्कृत्यांचे फळ भोगावे लागणार, माऊली यावर व्यक्त होताना म्हणतात ः
ऐसे होती तरुतृण । लोह लोष्ट (माती) पाषाण ।
इया खांदिया तेविची जाण । फळेंही हेचि ॥
रजोगुणांचे कर्मे आणि तमोगुणांचे कर्मे यामधून निर्माण होणारे कर्मफळ हे मानवी जीवनाचं संचित असतं. श्री ज्ञानेश्वरी वाचताना याच गोष्टीकडं आपल अवधान असलं पाहिजे. आपल्या जीवनाची नीत्य नैमित्यिक कर्म करताना ती आपल्या सर्वांकडून आपल्या इंद्रियांद्वारा होत असतात. या इंद्रियांमधील सर्वांत महत्त्वाच इंद्रिय म्हणजे आपली बुद्धी. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिय आणि चार आंतरेंद्रिये यामधील सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी असलेले ‘बुद्धीचं वैभव’ आपल्या जीवनात निर्णय घेताना अत्यंत महत्त्वाचे आहे. बुद्धीला सतत जागृत ठेवता आले पाहिजे. निर्णय प्रक्रियेत मनापेक्षा बुद्धीला पाचारण करत ‘विवेकाला’ संधी देऊन कर्माप्रती ‘न्याय’ करता आला पाहिजे. कर्माप्रती सजग राहणं हीच खरी जागृतता आहे. ज्ञानाच्या प्रकाशात घडलेले कुठलही कर्म हे मंगलमयच असणार. आपल्या कर्माप्रती आपले उत्तर-दायित्व निश्चित आहे. देवाघरचा न्याय सदैव स्मरणात ठेवल्यात आपण आत्मज्ञानाने व आत्मसंयमाने कर्म करत राहू. इतरांनी केलेल्या कर्माप्रती आपण उत्तरदायी नाही आहोत हे ही इथे लक्षात घेण्याजोगे आहे. आयुष्य हे वैयक्तिक पातळीवर जगावं लागणार आहे आणि त्याच्या कृतीच फळही वैयक्तिकच असणार आहे. म्हणूनच जीवनाकडे पाहण्याचा कर्माधिष्ठीत दृष्टिकोन माऊली निर्माण करून देतात. तुम्हा-आम्हाला जागे करतात.