

मुंबई : कांदिवली पूर्व येथील तीन गृहनिर्माण सोसायट्यांनी दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. शिवालिक टॉवर्स, शिवालय रेसिडेन्सी आणि गायत्री शिवम् या तीन सोसायट्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणी घेतली.
पालिकेने कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना रोखण्यासाठी केलेल्या अधिक प्रभावी उपाययोजनांची माहिती १ डिसेंबरपर्यंत न्यायालयाला देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.कुत्र्यामुळे तीन सोसायट्यांतील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. वारंवार चावण्याच्या घटनांनंतर रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली.
तीनही सोसायट्यांचा एकत्रित क्लस्टर असून तिथे सुमारे २,००० रहिवासी राहतात. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काळा आणि पांढरा कुत्रा दोघेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. चावा घेतलेल्यांमध्ये महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर आणि भेटायला आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण सुमारे ६० घटना घडल्या आहेत. त्यापैकी १३ घटना औपचारिकपणे नोंदवल्या गेल्या आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही कुत्र्यांना तात्काळ पकडून, लोकांच्या गर्दीपासून दूर असलेल्या आश्रयस्थानात किंवा पशुवैद्यकीय केंद्रात ठेवावे, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणी १ डिसेंबरला आहे.