

मुंबई : कांदिवली येथे हॉटेल सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना पालिका आर.दक्षिण विभाग कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक गणेश संजय कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
याप्रकरणी इतर अधिकार्यांचा सहभाग आहे का याबाबत एसीबी अधिक तपास करीत आहे. आरोपीने तक्रारदाराला तीन महिने रेस्टॉरन्स सुरू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांंची मागणी केली होती. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या मित्राचे हॉटेल असून मागील एक वर्षापासून ते तक्रारदार चालवित होते.
महापालिकेच्या आर.दक्षिण विभागातील आरोग्य विभागातील अधिकार्यांनी 24 जून रोजी तपासणी करीत हॉटेलमधील साहित्य जप्त करून हॉटेल बंद करण्यास सांगितले होते. 28 जून रोजी तक्रारदार पालिका आर. दक्षिण कार्यालयात गेले असता, तेथील स्वच्छता निरीक्षक गणेश कदम यांनी हॉटेल पुढील तीन महिने सुरू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली अशी तक्रार व्यवसायिकाने दिली होती.
बुधवारी सापळा रचण्यात आला. त्यात 30 हजार रुपये स्वीकारताना कदम यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची एसीबी कोठडी सुनावल्याची माहिती एसीबीने दिली.