

Mumbai Accident
पवई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. देवांश पटेल (२२) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो जोगेश्वरी येथे राहत होता. या अपघातात त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा (२२) जखमी झाला आहे. (Mumbai News)
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन देवांश आणि त्याचे मित्र स्कूटीवरून घरी परतत होते. पवईतील आयआयटी गेटजवळ एका मोठ्या खड्ड्यामुळे आणि त्याच्या बाजूला असलेल्या उंचवट्यामुळे त्यांची स्कूटी घसरली. त्यामुळे देवांश बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा जखमी झाला असून, त्याच्यावर पवई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांच्या मते, या खड्ड्याबाबत वारंवार तक्रारी करूनही तो बुजवला गेला नव्हता. काही महिन्यांपूर्वी इथूनच काही अंतरावर लालू कांबळे या व्यक्तीचा अगदी असाच मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (Mumbai News)