

मुंबई /नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सभागृहात होणार्या या सोहोळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित उपस्थित राहणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली असता कुलगुरूंशी झालेल्या चर्चेत सोळा वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा अध्यासन केंद्रासाठी दिलेल्या 2 कोटी रुपयांची माहिती मिळाली. कुलगुरूंनी आणखी 3 कोटींची मागणी केली असता मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून हा निधी देण्याचा निर्णय त्याच क्षणी घेतला. या मराठी अध्यासन केंद्राला कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र असे नाव देण्याची सूचनाही विद्यापीठाने मान्य केली आहे.
दिल्लीच्या तख्तावर मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करणे हे मराठी माणसासाठी अभिमानाचे आहे आणि ते पाऊल महायुती सरकारने टाकले आहे. मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाता येत असेल, देशाच्या कानाकोपर्यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयू सारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणे गरजेचे होते, असेही सांमत म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी 10 कोटी रुपये वर्ग केले होते, अशी माहितीही सामंत यांनी दिली. आता जेएनयूमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस बोलून दाखवत सामंत म्हणाले, या पुतळयासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जमीन देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
जेएनयूमध्ये मराठी भाषेचे अध्यासन 20 वर्षांपासून म्हणजे 2005- 06 पासून प्रलंबित आहे. या अध्यासनासाठी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जेएनयूला एक कोटी रुपयांचा धनादेश 2005-06 मध्ये सुपूर्द करण्यात आला होता. तरीही हे अध्यासन सुरू झाले नव्हते.
जेएनयूमध्ये चिनी, जर्मनी, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, कोरियन, इत्यादी विदेशी भाषांच्या अध्ययनाची सोय आहे. हिंदी भाषेचाही स्वतंत्र विभाग विद्यापीठात आहे. संस्कृतसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र (अध्यासन) देखील आहे. मराठीचे अध्यासन मात्र देशाच्या राजधानीत आजवर रखडले.
गेली 20 वर्षे विविध स्तरावर या अध्यासन केंद्रासाठी पाठपुरावा केला जात असला तरी त्याला मुहूर्त सापडत नव्हता. अलिकडेच 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आणि यादरम्यान केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि मराठी अध्यासनाला मुहूर्त मिळाला.