

मुंबई : सात-बारामधील मृत शेतकर्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी महसूल विभाग 1 एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम हाती घेणार आहे. विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रम आराखड्यांतर्गत ही मोहीम राबविली जाणार आहे.
1 मार्च 2025 पासून बुलडाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाने बुधवारी आदेश काढले. जिवंत सात-बारा मोहिमेंतर्गत सात-बारावर गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित तहसीलदारांची तालुक्यांकरिता समन्वय अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी यांची नियंत्रण अधिकारी, तर विभागीय आयुक्त यांची विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.