Jee Advance Exam Toppers: जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षेत शुभम कुमार देशात प्रथम; आरोही देशपांडे मुलींमध्ये अव्वल

परीक्षा 17 मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांत घेण्यात आली होती.
Jee Advance Exam Toppers
Jee Advance Exam ToppersPudhari
Published on
Updated on

मुंबई : देशातील आयआयटींसह अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी जेईई-ॲडव्हान्स्ड 2026 परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा परीक्षेला बसलेल्या 1 लाख 79 हजार 694 विद्यार्थ्यांपैकी 56 हजार 880 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दिल्ली विभागातील शुभम कुमार याने 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला, तर त्याच विभागातील आरोही देशपांडे हिने मुलींमध्ये अव्वल स्थान मिळवले.

परीक्षा 17 मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांत घेण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 87 हजार 389 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 79 हजार 694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालानुसार 56 हजार 880 विद्यार्थी पात्र ठरले असून यामध्ये 46 हजार 773 मुले आणि 10 हजार 107 मुलींचा समावेश आहे.

Jee Advance Exam Toppers
Mumbai Hawkers ID Card: 10 जूनपर्यंत मिळणार फेरीवाल्यांना ओळखपत्र

दिल्ली विभागातील शुभम कुमार याने 330 गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवला. त्याच विभागातील कबीर छिल्लर याने 329 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले, तर जतिन चाहर याने 319 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. अव्वल दहामध्येही दिल्ली विभागातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

Jee Advance Exam Toppers
Mumbai Water Supply: अप्पर वैतरणा तलाव आटला; मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद

विभागनिहाय निकालात आयआयटी मद्रास विभागाने सर्वाधिक 14 हजार 294 पात्र विद्यार्थी दिले आहेत. त्यानंतर आयआयटी मुंबई विभागातून 12 हजार 389 विद्यार्थी आणि आयआयटी दिल्ली विभागातून 10 हजार 697 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय सहभाग राहिला. या प्रवर्गातील 3 हजार 52 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 864 विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नपत्रिका दिल्या आणि 887 विद्यार्थी पात्र ठरले.

परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उत्तरतालिका आणि प्रतिसादपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्राप्त आक्षेपांची छाननी करून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. निकालासोबतच अंतिम उत्तरतालिकाही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता संयुक्त आसन वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेद्वारे देशातील 23 आयआयटींसह विविध राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर संस्थांमधील प्रवेश निश्चित होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news