Pudhari Mahasummit 2026 | दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्या : जयंत पाटील

Pudhari Mahasummit 2026 |
Pudhari Mahasummit 2026 | दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्या : जयंत पाटीलM.S.B
Published on
Updated on

दिलीप शिंदे

मुंबई : एनडीए सोबत जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांतर्गत कुठलीही चर्चा झाली नसल्याने त्यास रोहित पवार यांच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. त्या माध्यमांनी उठविलेल्या वावड्या आहेत. मी पक्षासोबत राहणार आहे, असे सांगत अजित पवार यांच्याच आग्रहामुळे सुरू झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा त्यांच्या निधनानंतर पूर्णपणे थांबल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी पुढारी न्यूजच्या महा समिट २०२६ मध्ये झालेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यावेळी पाटील यांनी एनसीपीचे भविष्य आणि स्वतःच्या राजकीय भूमिकेबाबत सडेतोड उत्तरे दिली.

शरद पवार यांची एनसीपी ही इंडिया आघाडी सोडून एनडीए सोबत जाणार असून त्याअनुषंगाने दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटींबाबत थेट विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी ह्या माध्यमांनी उठविलेल्या वावड्या असल्याचे स्पष्ट केले. सुप्रिया सुळे ह्या मुलीच्या लग्‍नाचे आमंत्रण आणि दुसऱ्यांदा सहा खासदारांसह त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे, विमानतळ यासह मोठ्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते, असे पाटील म्हणाले.

केंद्र सरकारला डिलिमिटेशन बिलाच्या मंजुरीसाठी खासदार कमी पडत असल्याने भाजप इतर पक्षांच्या खासदारांच्या संपर्कात आहे. आमच्याकडून एनडीए सोबत जाण्याची कुठलीही चर्चा झालेली नसून आमची पक्षांतर्गत चर्चा ही केलेली नाही. हालचाली नाहीत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांचा एनडीए सोबत जाण्यास विरोध असल्याची चर्चा ही केवळ माध्यमांमध्ये होत आहे. आमच्यात याबाबत चर्चा झाली असल्याने कुठल्याही विरोधाचा प्रश्नच येत नाही, असे सांगून पाटील यांनी मीडिया ही घटना घडण्यापूर्वीच चर्चा करते, असा टोला हाणला. आमदार रोहित पवार यांची काँग्रेसशी जवळीक वाढण्यामागील कारणमीमांसा करताना पाटील म्हणाले राहुल गांधी हे आमच्या आघाडीचं, मित्र पक्षाचे राष्ट्रीय नेते असून त्याचे स्वागत करणे प्राकृतिक आहे. उद्या उद्धव ठाकरे आले की त्यांचे स्वागत तसेच केले जाईल. त्याबाबत गैरसमज करण्याची गरज नाही, असे पाटील म्हणाले.

आघाडीतील सर्व पक्षांचे उत्तम संवाद असून समन्वय आहे. आता कुठले ओकेशनं नाही. एकमेकांबाबत विश्वास असून आमच्या भेटीने बातम्या तयार होत नसल्याची मिश्‍कील टिपणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पक्ष काँग्रेस असून काही तत्कालीन कारणामुळे आमचे नेते शरद पवार यांनी पक्षाची स्थापना झाली. पक्ष उभे आणि प्रभावी झाले. आम्ही कायम सत्तेत राहिलो आहोत. काँग्रेस आणि एनसीपी यांची विचारसरणी, तत्त्‍व एकच आहे. फरक काहीच नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी दोन्ही पक्षाचा विलीनीकरणाचा प्रश्नाला बगल दिली. एनडीएसोबत जाण्याची माझी व्यक्तिगत भूमिका नसून पक्ष जी भूमिका घेईल, त्यासोबत आहे. जिथे पक्ष असतो तिथे व्यक्तिगत भूमिका मांडायची नसते. व्यक्तिगत विधाने करणे उचित नसून मी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. मी नाराज आहे, भाजपमध्ये जाणार, असे माध्यमांमधून चर्चा होते आता फक्त मनसे, कमुनिस्ट पार्टीत जाणार याची चर्चा होण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित दादांनी सुरू केली. त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्रित येऊन मजबूत करायची. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मार्च २०२५ मध्ये दादांनी चर्चा सुरू केली. त्याच्या आग्रहाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत गेलो. बऱ्याच बैठका झाल्या. जिल्हा निहाय चर्चा झाल्या होत्या. मात्र दादांच्या निधनानंतर विलीनीकारणाची कुणाशी करायची आणि चर्चा थांबली. दादांशी संबंध हे ३५ ते ४० वर्षाचे राहिले. आमचे संबंध कधी बिघडले नाही. पक्ष सोडून जाताना दादांनी तीन बैठका घेतल्या. त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा आग्रह धरला; मात्र शरद पवार हे तयार झाले नाही आणि दादांनी निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

अजित दादा हे ‘दादा’ होते. ते काय बोलणार ते आम्हाला अगोदर कळायचे, असे आम्ही एकरूप झालेलो होतो, असे सांगत पाटील म्हणाले, सुनेत्रा वाहिनींसोबत राजकीय संबंध नाही, एक गृहिणी ते उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास असून त्या अडचणीवर मात करतील. एनसीपी हा लहान पक्ष असून शरद पवार यांचे विचार हे आमच्या पक्षाचे भांडवल आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांना मानणारा मतदार आहे. आजही त्यांचे खूप फॉलोअर आहेत. पुरोगामी विचार कायम टिकविण्याचे प्रयत्न करीत आहेत. सहकार क्षेत्रात चुकीच्या धोरणामुळे साखरेचे भाव वाढले, साखर उत्पादक, शेतकरी अडचणीत आला आहे. आम्ही सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून सहकारातील सुधारणांबाबत निवेदन दिले मात्र अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाही. मेरिटवर अडचणीत साखर कारखानांना मदत केली पाहिजे, राजकारण नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २० लाख टन साखर निर्यात झाली आणि १० लाख टन साखर आयात करण्यात आली. हे चुकीच्या धोरणामुळे झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

इथेनॉलसाठी साखर पुरविली जाते म्हणून तुटवडा झाला हे म्हणणे सरकारवर अन्याय होय. साखरेचे उत्पादन कमी झाले असून इथेनॉल साखर उत्पादकांना मदत होण्यासाठी तयार केले जाते. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे अजित दादाचे स्वप्न होते. राज्याकडे उत्तम पॉलिसी बनवायला हवी जेणेकरून गुंतवणूकदार आकर्षित होतील. सद्या रोजगार निर्मिती होत नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांच्याकडून नव्या पिढीला संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या पिढीला विश्वासात घेऊन पुढे करून पक्ष वाढीचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. विधानसभेत अपयश मिळाले. आता सुप्रिया सुळे या पुढाकार घेऊन पक्ष बांधणी आणि वाढीसाठी काम करीत आहे. शरद पवार यांनी १९९९ मध्ये तिशीमधील ६ मंत्री बनवले. त्यांनी आयुष्यभर नवीन पिढीला पुढे नेण्याचे काम केले आणि आता सुप्रिया सुळे करीत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news