

मुंबई: मुंबईतील दादर परिसरात आज (दि.3) सकाळपासून तणावाचे वातावरण आहे. येथील प्रसिद्ध कबुतरखान्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जैन समाज आणि प्राणीप्रेमींनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. हातात कबुतरे घेऊन, 'मुक्या जीवांना न्याय द्या' अशा घोषणा देत आंदोलक प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत.
दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध कबुतरखाना अनेक वर्षांपासून हजारो कबुतरांच्या खाण्याची आणि विसाव्याची जागा आहे. मात्र, महानगरपालिकेने शनिवारी (दि.२) या जागेवर अचानक एक शेड उभारले. यामुळे कबुतरांना दाणे खाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे प्राणीप्रेमी, विशेषतः जैन समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आणि आज सकाळपासून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
आंदोलकांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने कबुतरांचा विचार न करता ही कारवाई केली आहे. कबुतरखान्यावर उभारलेले शेड तात्काळ हटवण्यात यावे. कबुतरांच्या खाण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा बंद करू नये. "कबुतर हा मुका प्राणी आहे, तो स्वतःसाठी बोलू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर असा अन्याय सहन केला जाणार नाही," अशी संतप्त भावना आंदोलक व्यक्त करत आहेत. जर प्रशासनाला स्वच्छतेची किंवा इतर कोणतीही अडचण असेल, तर त्यांनी पर्यायी आणि कायमस्वरूपी व्यवस्था करावी, पण कबुतरांना वाऱ्यावर सोडू नये.
या आंदोलनामुळे दादर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत प्रशासन यावर सकारात्मक तोडगा काढत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आता महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि या मुक्या जीवांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला यश मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.