

मुंबई : राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयात त्वचारोग विभागाचे नूतनीकरण करून आता अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विटिलिगो (सफेद दाग) असलेल्या रुग्णांसाठी स्किन ग्राफ्टिंगची सुविधा येथे सुरू करण्यात आली असून अशा उपचारासाठी जेजे राज्यातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे.
त्वचारोग विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद राठोड यांनी सांगितले की, विटिलिगो रुग्णांना त्वचेवरील डागांवर स्किन ग्राफ्टिंगद्वारे उपचार मिळणार आहेत. तसेच कुष्ठरोग, सोरायसिस, पेन्फिगस, मोठे पाणीदार फोड यांसारख्या गंभीर त्वचारोगांवरही आधुनिक पद्धतीने उपचार उपलब्ध होणार आहेत. विभागात नव्या ओपीडीची सुरुवात झाली असून निकट भविष्यात लेझर थेरपी, फोटो थेरपी, कॉस्मेटिक सर्जरी यांसारख्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
कॉस्मेटिक सर्जरी व लेझर उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत लाखो रुपये खर्च येतो; मात्र जेजे रुग्णालयात हे उपचार अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत. यातून सामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात दीर्घकालीन आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
जेजे रुग्णालयात सुरू झालेल्या या नव्या सुविधेमुळे त्वचारोगांवरील आधुनिक व किफायतशीर उपचार रुग्णांना सहज उपलब्ध होतील. वाढत्या रुग्णसंख्येला उत्कृष्ट सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय