मुंबई : आयव्हीएफ ही खर्चिक प्रक्रिया सर्वसामान्यांना मोफत करता यावी यासाठी शासनाच्या कामा रुग्णालयात दीड वर्षांपूर्वीच आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र कुटुंब कल्याण विभागाची परवानगी न मिळाल्याने आयव्हीएफ प्रक्रिया येथे सुरू होवू शकलेली नाही. त्यामुळे आययूआय या सहाय्यक पुनरुत्पादक प्रक्रियेद्वारे येथे सध्या उपचार सुरू आहेत.
गर्भधारणा होऊ न शकणार्या जोडप्यांना मोफत वंध्यत्व उपचार देण्यासाठी 6 मार्च 2024 रोजी येथे आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यात आले. दररोज 20 ते 30 रुग्ण संबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी येथे येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारील गुजरात, त्रिपुरा या राज्यांतूनही मोठ्या संख्येने जोडपी उपचारासाठी येत आहेत.
गेल्या दीड वर्षात रुग्णालयाच्या ओपीडी विभागात 2,981 महिला उपचारासाठी आल्या आहेत. मात्र त्यांच्यावर आययूआय या सहाय्यक पुनरुत्पादक प्रक्रियेद्वारे उपचार करण्यात आले. यात अठरा जोडप्यांवर यशस्वी उपचार झाले आहेत. असे असताना दिड वर्षे याची पुढील उपचार प्रक्रिया असलेल्या आयव्हीएफला मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
येथील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, आयव्हीएफ प्रक्रियेला मान्यता न मिळाल्यामुळे रुग्णालय आयव्हीएफ उपचारांचा पहिला टप्पा म्हणजेच आययूआय करत आहे. नियमांनुसार, पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुसरा परवाना मिळण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतात. परंतु कामामध्ये पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षे होत आहेत, परंतु आयव्हीएफ प्रक्रियेची परवानगी अद्याप मिळालेली नाही.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, खासगी रुग्णालये आणि अनेक आयव्हीएफ केंद्रांमध्य बहुतेक जोडप्यांना लाखो रुपये खर्च करून आयव्हीएफ प्रक्रिया दिल्या जातात. इतके खर्च करूनही 50 टक्के प्रकरणांमध्ये अपयशी येते. कामा हॉस्पिटलमध्ये आम्ही आयव्हीएफ उपचारापूर्वी रुग्णांना प्रथम आययूआय देतो. हे एक सहाय्यक पुनरुत्पादक तंत्र आहे. ही प्रक्रिया गर्भधारणेस मदत करते. यामध्ये उत्पादित शुक्राणू थेट गर्भाशयात ठेवले जातात. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. आतापर्यंत या प्रक्रियेद्वारे 18 जोडप्यांना बाळाचा आशीर्वाद मिळाला आहे.