

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करणार्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचण्याचे काम करण्याची शंभर टक्के जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांसह न्यायाचा लढा लढण्याचा आपला संकल्प आहे. मुंडे भेटीबद्दल मला षडयंत्र करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार नसून येत्या 20 तारखेला कृषी विभागातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा पत्रकार परिषद घेऊन आपण उघडकीस आणणार आहोत. अशी स्पष्टोक्ती आमदार सुरेश धस यांनी केली आहे. मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचेकडे अनेक विषयांवरील पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास यंत्रणेमध्ये सायबर विभागाचे तज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा कारण संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर काही आरोपी निष्पन्न झाले आहेत. परंतु त्यांचे मोबाईल त्यांनी फेकून दिल्यामुळे सायबर क्षेत्रातील तज्ञांद्वारे त्यामधील माहिती गोळा करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आणणार असून त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेणार आहे. असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे नियोजन व अर्थ विभाग असल्यामुळे बीड जिल्हा नियोजन व विकास निधीतील 73 कोटी रुपयांची बोगस बिले काढणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली असून लवकरच याबाबत कारवाई होणार आहे असेही त्यांनी सांगितले.