

मुंबई : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र आकर्षक वेतनामुळे अनेक वर्षे चर्चिले जात आहे. मात्र, आता या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना कवडीमोल वेतनावर नोकरी दिली जात आहे. या क्षेत्रातील वरिष्ठांचे वेतन पाच वर्षांत ६० टक्क्यांपर्यंत वाढले असून, नवोदितांच्या वेतनात मात्र १३ वर्षांत अवघी १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी मोहनदास पै यांनी हे वास्तव उघड केले आहे.
आयटी कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे वेतन पाच वर्षांपूर्वी आणि आत्ता काय आहे, हे पाहिल्यास आपल्याला वरिष्ठांच्या वेतनश्रेणीतील वाढ लक्षात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात या कालावधीत ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. संचालक मंडळाच्या भत्त्यात २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. आयटीतील सर्वांत कमी वेतनश्रेणीत नवोदित असतात. नवोदितांना २०११ साली ३.२५ लाख रुपये वेतन दिले जात होते. त्यात गत तेरा वर्षांत साडेतीन ते ३.७५ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यांचे वेतन १३ वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे.
आयटी सीईओचे वेतन पाच वर्षांत १६० टक्क्यांनी वाढून वार्षिक ८४ कोटी रुपयांवर गेले आहे. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएलटेक, विप्रो आणि टेक महिंद्रासारख्या कंपन्यांतही वेतनातील तफावत ठळक दिसून येत आहे. नवोदितांवर करण्यात येणारा खर्च कमी करून वरिष्ठांना अधिक वेतन दिले जात आहे का? मुळात वरिष्ठांना इतक्या मोठ्या प्रमाणावर वेतनरूपी पारितोषिकाची गरज आहे का? असा प्रश्न विचारला पाहिजे, असे पै म्हणाले.
मागणीपेक्षा नवोदित आयटीयन्सची उपलब्धता जास्त असणे, त्यांच्या प्रशिक्षणावर कंपनीला करावा लागणारा खर्च, यामुळे नवोदितांना वेतन कमी असल्याचे मनी कंट्रोलने 'नेल्सन हॉल' या विश्लेषक कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे.