विजयदुर्गच्या खाडीत 'गुलदार' युद्धनौकेचे संग्रहालय

Konkan Tourism | कोकणातील पर्यटकांसाठी नवे आकर्षण
Konkan Tourism INS Guldar
Konkan Tourism | विजयदुर्गच्या खाडीत 'गुलदार' युद्धनौकेचे संग्रहालय file photo
Published on
Updated on

मुंबई : भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका 'आयएनएस गुलदार'चा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आला असून आता ही युद्धनौका विजयदुर्गच्या खाडीत समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली असलेली ही युद्धनौका स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार असून कोकणातील पर्यटकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती. नौदलामध्ये ४० वर्षे सेवा बजावल्यानंतर ही युध्दनौका सेवेतून निवृत्त झाली. कारवारमधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाच्यावतीने आज ही युध्दनौका पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात आली. नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार असून पाणबुडीतून समुद्रतळ आणि युध्दनौकाही दिसेल अशी योजना आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली.

हस्तांतर झाल्यानंतर 'आयएनएस गुलदार' लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल. तेथे युद्धनौका शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. त्यानंतर युद्धनौका विजयदुर्ग खाडीत तळाशी नेण्यात येईल. समुद्राच्या तळाशी स्थिरावल्यानंतर या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने तीन ते चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार आहेत, असे सूर्यवंशी म्हणाले.

विजयदुर्ग परिसरात हा प्रकल्प का ?

सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. यामध्ये आरमारासाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा असंख्य प्रकारच्या युद्धनौका बांधल्या जात होत्या. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघवट खाडी निश्चित करण्यात आली होती. ही खाडी सुमारे ४२ किलोमीटर लांब आणि ४० ते ५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जात असे. तसेच आरमारी गनिमी काव्यासाठीही हे मोक्याचे ठिकाण होते. त्यामुळे विजयदुर्ग बंदराची निवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news