

मुंबई : ६ दिवसांच्या गोंधळानंतर इंडिगो एअरलाईन्सने आपल्या ७५ टक्के फेऱ्या पूर्ववत केल्या. इंडिगोकडून दररोज २३०० विमानफेऱ्या चालवल्या जातात. शनिवारी १५००, तर रविवारी १६५० फेऱ्या चालवण्यात आल्या. रविवारी (दि.7) इंडिगोने एकूण १३८ ठिकाणांपैकी १३५ ठिकाणी विमानांच्या फेऱ्या पोहोचवल्या. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, इंडिगोच्या ७५ टक्के विमानांनी त्यांच्या निर्धारित वेळा पाळल्या आहेत.
१० डिसेंबरपासून इंडिगोचे वेळापत्रक पूर्ववत होईल. प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे ६१० कोटी रुपये परत केले आहेत. तसेच, जवळपास ३००० बॅगादेखील प्रवाशांपर्यंत पोहोचवल्या आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली.
१,५०० हून अधिक उड्डाणे सुरू; लवकरच सेवा पूर्ववत
इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात रद्द झालेल्या उड्डाणांमुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर एक संसदीय समिती खासगी विमान कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आणि नागरी विमान वाहतूक नियामकांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनास जाण्यासाठी विमानसेवा नसल्याने आमदारांची गैरसोय झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लवकरच सेवा पूर्ववत होणार असून १,५०० हून अधिक उड्डाणे सुरू केली आहेत.
जेडी (यू) नेते संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीविषयक संसदीय स्थायी समिती, विमान कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून विमानसेवेतील व्यत्ययाची कारणे आणि संभाव्य उपाययोजनांबद्दल स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे.
एका सदस्याने सांगितले की, समितीने विमानसेवेतील व्यत्ययामुळे हजारो प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेतली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी राजधानीत असलेल्या खासदारांनाही इंडिगोच्या विमान रद्द होण्याचा आणि इतर विमान कंपन्यांच्या विलंबाचा फटका बसला, असे समितीच्या सदस्याने सांगितले.
अनेक खासदारांना या परिस्थितीमुळे वाढलेल्या विमान भाड्याबद्दल लोकांकडून तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, वाहतूक स्थायी समितीचे सदस्य नसलेले सीपीआयचे (एम) राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनी मोठ्या प्रमाणातील विमानसेवेच्या व्यत्ययाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात इंडिगोने म्हटले आहे की, मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या मंडळाने एक संकट व्यवस्थापन गट स्थापन केला आहे, जो परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे बैठक घेत आहे. कंपनीचे संचालक मंडळ ग्राहकांना भेडसावणाऱ्या आव्हानांची काळजी घेण्यासाठी आणि प्रवाशांना परतावा सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, असे त्यात म्हटले आहे.
प्रवाशांना ६१० कोटी परत
देशव्यापी व्यत्ययानंतर सुमारे एका आठवड्याने इंडिगोने आपली विमानसेवा वेगाने वाढवली असून, १० डिसेंबरपर्यंत ती पूर्णपणे स्थिर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर होणारी राजकीय टीका आणि नियामक कारवाई दरम्यान एअरलाईनचे हे प्रयत्न सुरू आहेत. इंडिगोने प्रवाशांना ६१० कोटी परत केले आहेत.