

मुंबई ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अर्थात आयआयटीने जगभरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. सर्वाधिक उद्योगपती देणार्या संस्थांमध्ये भारतातील आयआयटी संस्थांचा क्रमांक लागतो. अलीकडच्या काळात या आयआयटीने दोनशेहून अधिक आघाडीचे उद्योगपती दिले आहेत. त्यात दिल्ली आणि मुंबईतील आयआयटी आघाडीवर आहेत.
आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाने आघाडीच्या उद्योगपतींची यादी जाहीर केली आहे. त्यातील बहुतांश आयआयटीचे पदवीधर आहेत. दिल्ली आयआयटीच्या 36 माजी विद्यार्थ्यांनी उद्योग जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यात झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांचा समावेश आहे. आयआयटी बॉम्बे आणि खरगपूरने अनुक्रमे 20 आणि 19 नामांकित उद्योगपती दिले आहेत. बॉम्बे आयआयटीने ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावीश अगरवाल आणि डेलीहंटचे वीरेंद्र गुप्ता यांसारखे उद्योगपती दिले आहेत. खरगपूर आयआयटीने ऑफबिझनेसच्या आशिष मोहपात्रांना घडविले आहे. कानपूर, मद्रास, रुरकी या संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनीही उद्योगांची वाट चोखाळली आहे.
दिल्ली विद्यापीठ आणि दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने मेक माय ट्रिपचे दीप कालरा आणि पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांसारखे उद्योगपती घडविले आहेत. याशिवाय हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि व्हार्टन स्कूल देखील आघाडीवर आहे. स्टॅनफोर्डच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये निर्मित पारीख (अपना) यांचा समावेश आहे, तर व्हार्टनने अपस्टॉक्सच्या कविता सुब—ह्मण्यम यांना घडविले आहे.