Stock Market : गुढीपाडव्याला शेअर बाजार कोसळला

युद्धामुळे 22 महिन्यांतील सर्वात मोठी 2496 अंकांची आपटी
Stock Market
Stock Market
Published on
Updated on

मुंबई ः इराण युद्धाच्या आगीची झळ भारतीय निर्देशांकाला बसली असून, गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशीच सेन्सेक्स 2496, तर निफ्टी 775 अंकांनी कोसळला. गेल्या 22 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 12 लाख कोटींचा फटका बसला. सोबतच युद्धात तेल शुद्धीकरण कंपन्यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे कच्च्या तेलाचे (क्रूड ऑईल) दर प्रतिपिंप 116 डॉलरवर गेले असून युरियाची किंमत प्रतिटन 425 वरून 600 डॉलरवर पोहोचली आहे. या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 3.6 टक्क्यांनी म्हणजेच 2,753 अंकांनी गडगडून 73,950 या दिवसातील नीचांकी पातळीवर आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 3.26 टक्क्यांच्या घटीसह 74,207 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक सकाळच्या सत्रात साडेतीन टक्क्यांनी अथवा 847 अंकांनी घसरून 22,930 अंकांवर घरंगळला. बाजार बंद होताना निफ्टी निर्देशांक 3.26 टक्क्यांच्या घटीसह 23002 अंकांवर विसावला.

एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला

एचडीएफसी बँकेचे पार्टटाईम चेअरमन अतानू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर या बँकेचा शेअर भाव 8 टक्क्यांनी गडगडून 722 रुपयांवर आला. एचडीएफसीची बीएसईवरील 52 सप्ताहांतील सर्वात खराब कामगिरी ठरली. निफ्टीतील सर्व निर्देशांकाचे नुकसान झाले. निफ्टी प्रायव्हेट बँक, ऑटो, आयटी, एफएमसीजी, पीएसयू बँकेत घसरण झाली.

कच्च्या तेल दराचा भडका

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धात आता तेल शुद्धीकरण कंपन्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दराचा गुरुवारी भडका उडाला. ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 9.61 डॉलरने वधारून 116.38 डॉलर प्रतिबॅरलवर गेले; तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचे भाव 1.58 टक्क्याने वाढून 96.97 डॉलरवर गेले होते. त्यापूर्वी यूएसच्या तेलाने 100.02 डॉलरला स्पर्श केला होता. इराण युद्धाला 28 फेब्रुवारी रोजी तोंड फुटले. त्यानंतर बुधवार (दि. 18) पर्यंतच्या सलग 14 व्या सत्रात विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) शेअर विक्रीचा मारा केला. बुधवारी विदेशी संस्थांनी 2 हजार 714 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मार्च महिन्यातील पहिल्या नऊ सत्रांत विदेशी संस्थांनी 56,883 कोटी रुपये काढून घेतले असून जानेवारी 2026 पासून 1.04 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

रुपया नीचांकावर

युद्धामुळे तेल दराचा उडालेला भडका, विदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून काढून घेतलेली गुंतवणूक यामुळे गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकावर गेला. एका डॉलरसाठी 92.63 रुपये मोजावे लागत आहेत.

खतांच्या किमतीचा भडका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्धापूर्वी युरियाचा मुबलक साठा होता. त्यामुळे त्याचे दरही प्रतिटन 425 डॉलरवर होते. युद्धानंतर पुरवठा घटल्याने युरियाचे दर प्रतिटन 600 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे खतांचा प्रमुख आयातदार असलेल्या भारताने रशिया, बेलारूस आणि मोरोक्कोकडून खतांचा पुरवठा अधिक व्हावा यासाठी बोलणी सुरू केली आहेत. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. भारत युरिया, डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि म्युरिएट ऑफ पोटॅश यांसारखी खते, तसेच युरिया उत्पादनासाठी महत्त्वाचा कच्चा माल असलेला द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) आयात करतो. भारताच्या डीएपी आणि युरिया आयातीपैकी जवळपास निम्मा वाटा मध्य पूर्वेचा आहे. त्यातही सौदी अरेबिया हा डीएपीचा सर्वात मोठा पुरवठादार असून ओमान हा युरियाचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. युद्धामुळे हा पुरवठा बाधित होऊन शेतकरी हैराण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news