

राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढते आहे, शासनाच्या अनेक योजना ठप्प आहे. आर्थिक संकटात सत्ताधाऱ्यांनी चांदीच्या ताटात पाच हजार रुपयांच्या थाळीचा ' शाही ' अनुभव घेतला. या आर्थिक कंगालीतसुद्धा सरकारला फक्त दिखावा करायचा आहे. गरिबांच्या वाट्याचं अन्न बाजूला ठेऊन, स्वतः मात्र शाही थाटात जगायचं आहे. हा प्रकार गरीब आणि सामान्य जनतेच्या जखमांवर तिखट मीठ चोळणे आहे. सत्ताधाऱ्यांना चांदीच्या ताटात बसून, उपाशी पोटांचं दुःख कसं समजणार?, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. २५ जून) माध्यमांशी बोलताना केला.
संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेच्या समारोपावेळी अध्यक्षांसह खासदार- आमदारांसाठी चांदीच्या थाळीत शाही जेवणाचा बेत करण्यात आला. एका चांदीच्या थाळीचे भाडे ५५० रूपये तर भोजनाचा खर्च चार हजार रूपये करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर बोलताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर आधीच भार असताना दुसरीकडे लोकप्रतिनीधींच्या जेवणावर एवढा खर्च करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चांदीच्या थाळीतील शाही भोजनावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही, धान उत्पादक शेतकरी संकटात आहे, धानाला बोनस देण्याची घोषणा केली त्याचाही पत्ता नाही कोतवालांना मानधन नाही, कर्मचाऱ्यांचे पगार 10 ते 12 दिवस उशिरा चालले आहे. दहा लाख कोटींचा सरकारवर कर्ज झालेला आहे, असा आर्थिक संकटात असल्यावर एवढा बडेजाव का दाखवायचा? जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे अशा स्थितीत चांदीच्या ताटात साडेचार पाच हजार रुपयांचा जेवण देण्याची काय गरज होती? - शेतकरी गरिबांच्या प्रति थोडी कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असते. असेही ते म्हणाले.
गुजरात राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती का होत नाही, महाराष्ट्रात मराठीची सक्ती सर्व लोकांवर का होत नाही, शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती करता, पाचवीपासून लागू करत का नाही, कुणाचे चोचले पुरवत आहेत, कोणाला खुश करण्यासाठी करताय ? असेही सवालेही त्यांनी केले. मराठीचा अस्तित्व संपवण्यासाठी अशा प्रकारे हिंदी भाषा सक्ती करणे यावर अजित पवारांनी केवळ भूमिका मांडून काही होत नाही तर मंत्रिमंडळात चर्चा करून आग्रही का झाले नाही हा प्रश्न उपस्थित होतोय, असेही ते म्हणाले.
ज्यांनी स्वातंत्र्यविरोधात केले, ज्या विचारधारेने गांधी हत्या केली, ज्या विचारधारेने तिरंगा 50 वर्ष फडकवला नाही, ज्या विचारधारेने स्वातंत्र्यात इंग्रजांची साथ दिली आज रोज संविधानाची हत्या करण्यात येते, कायद्याने राज्य चालवायचे नाही असं रोज सुरू आहे. अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली हे म्हणणे हास्यास्पद आहे. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींना जे प्रचंड बहुमत मिळालं त्यावर आणीबाणी योग्य होते हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्या कोण आहे, यवतमाळ मध्ये जाऊन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसतो, याला अधिकार कोणी दिला, असे सवाल करत त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे का? यांच्या विचारात विषारी विचार आहेत. केवळ धार्मिक वाद करून स्वतःची पोळी भाजण्याचा मनसुबा आहे, असा आरोपही त्यांनी केला.