मुंबई : काम-धंद्यासाठी जगाच्या कानाकोपर्यात गेलेल्या भारतीयांनी 2024-25 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 135.46 अब्ज डॉलर पाठवले आहेत. गतवर्षीपेक्षा त्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली असून, हा आत्तापर्यंतचा विक्रमी आकडा ठरला आहे.
मायदेशी पैसे पाठवण्यात भारतीय गत दहा वर्षांपासून आघाडीवर आहेत. आर्थिक वर्ष 2016-17मध्ये भारतीयांनी 61 अब्ज डॉलर भारतात पाठवले होते. त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या चालू खात्यात 1 लाख कोटी डॉलर आले. त्यातील दहा टक्के वाटा विदेशातील भारतीयांनी पाठवलेल्या रकमेचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गौरा सेनगुप्ता म्हणाल्या, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीनंतरही विदेशातून येणार्या पैशांचा ओघ कमी झालेला नाही. याचा अर्थ अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर सारख्या देशांमध्ये कुशल भारतीयांची संख्या वाढली आहे. विदेशातून येणार्या एकूण रकमेपैकी या तीन देशांमधून भारतात 45 टक्के रक्कम येते. देशात येणार्या एकूण पैशांपैकी सॉफ्टवेअर आणि व्यवसायाचा प्रमुख वाटा आहे.
या दोन्ही क्षेत्रातून प्रत्येकी शंभर अब्ज डॉलरहून अधिक रक्कम भारतात येते. विदेशातील भारतीयांकडून येणारा पैसा, सॉफ्टवेअर आणि व्यवसायामधून सर्वाधिक परकीय चलन भारताला मिळते.
भारतीयांकडून पाठवले जाणारे परकीय चलन थेट परकीय गुंतवणूकीहून अधिक आहे. त्यामुळे विदेशी चलनाचा एक स्थिर मार्ग देशाला उपलब्ध झाला आहे. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये आयात-निर्यातीमधील तफावत 287 अब्ज डॉलर होती. त्याच्या निम्मी रक्कम (47 टक्के) विदेशातील भारतीयांनी पाठवली आहे.
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार विदेशातून मायदेशी पैसे धाडण्यात भारतीय आघाडीवर आहेत. भारतानंतर मेक्सिकोचे नागरिक आपल्या मायदेशी सर्वाधिक पैसे पाठवतात. तिसर्या क्रमांकावर चीन आहे. या दोन्ही देशातील नागरिकांनी 2024मध्ये अनुक्रमे 68 आणि 48 अब्ज डॉलर पाठवले आहेत.