

मुंबई : येत्या काळात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल एलएनजी, पीएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक हे इंधन उपयोगात येतील. देशभरातील दहा महामार्गांवर हायड्रोजन इंधनावरचे ट्रक चालविण्याची योजना राबविली जाणार आहे. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद या हायड्रोजनमध्ये आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून हायड्रोजनचे नियोजन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘पुढारी न्यूज’च्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त वरळी येथील एनएससीआय सभागृहात आयोजित ‘पुढारी न्यूज महासमिट : 2025’मध्ये गडकरी बोलत होते. ‘विचारमंथन विकासाचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे’ या संकल्पनेवर दिवसभर चाललेल्या या महासमिटमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्रे पार पडली. कृषी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मिती वाढवावी लागणार आहे. शेतकर्यांना समृद्ध - संपन्न बनविल्याशिवाय सुखी महाराष्ट्र उभा राहू शकत नाही आणि आत्मनिर्भर भारतही होऊ शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले. राष्ट्रासाठी महाराष्ट्राला कृषी क्षेत्राच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. त्यासाठी सिंचन आणि हायड्रोजन, इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या उत्पादनात वाढ करावी लागणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
या महाशिखर परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी दै. ‘पुढारी’चे चेअरमन एमिरेटस् आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्यासह संचालक डॉ. स्मिता जाधव, संचालक शीतल पाटील, संचालक मंदार पाटील, ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या उद्घाटनाच्या सत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी करायच्या कामांचा ऊहापोह केला.
डोळे दान करणे शक्य आहे, पण विकासाची दृष्टी देणे शक्य नसल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योग आणि शेती ही दोन क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. या दोन क्षेत्रांच्या भरभराटीसाठी पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे आहे. याशिवाय पाणी, ऊर्जा, परिवहन आणि कम्युनिकेशन या चार बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कृषी क्षेत्र सर्वात महत्त्वाचे आहे आणि कृषी क्षेत्रासाठी सिंचन अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्पांची कामे सुरू झाली. मात्र, ते प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. केंद्रात जेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते होते तेव्हा पंतप्रधान सिंचन योजनेतून सात हजार कोटी आणि बळीराजा योजनेतून आठ हजार कोटी असा 15 हजार कोटींचा निधी महाराष्ट्रासाठी मंजूर केला. त्यातून महाराष्ट्रात 15-15 वर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले. या प्रकल्पांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचल्याचे पाहून आनंद झाला. ज्यांच्यापर्यंत हे पाणी पोहोचले त्यांना याचे महत्त्व माहीत आहे, असे गडकरी म्हणाले.
राज्यात पाण्याची कमतरता नाही, तर नियोजनाची कमतरता असल्याचे परखड मत मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झाली पाहिजेत. राज्यातील सिंचन सध्या 26 -27 टक्के आहे. ते प्रमाण 50 टक्क्यापर्यंत वाढले पाहिजे. हे उद्दिष्ट गाठल्यास शहरेच नाही तर राज्यातील गाव-खेडीही स्मार्ट होतील. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरात ग्रामीण भागातून येणारे लोकांचे लोंढे हे खुशीने नाही तर मजबुरीतून येत असतात. शेतीत उत्पन्न नाही, तरुणांच्या हाताला काम नाही अशी ग्रामीण भागाची अवस्था आहे. हे बदलण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, परिवर्तन होत आहे. परंतु त्याची गती वाढविण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात सिंचनाच्या सुविधा वाढविल्या तर शेतकर्यांचे उत्पन्न अडीच पटींनी वाढणार आहे. ही वाढ झाल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पाणी आहे, ऊस आहे, साखर कारखाने आहेत. त्यामुळे तिथले दरडोई उत्पन्न राज्यात सर्वात जास्त असल्याचे गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.
इथेनॉलची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास पेट्रोलची गरजच भासणार नाही. आजघडीला आपण पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकतो. देशात इथेनॉल तयार करणार्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. खनिज तेलाच्या आयातीसाठी देशाचे 22 लाख कोटी रुपये खर्ची पडतात. त्यामुळे इथेनॉलचा वापर वाढल्यास आयातीवरचे अवलंबन कमी होईल. परदेशात जाणारा हा पैसा महाराष्ट्राच्या गरिब शेतकर्याला मिळेल. जेव्हा मक्यापासून इथेनॉल बनवायला परवानगी दिली, तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला होता. मात्र, या एका निर्णयामुळे आज मक्याचे भाव तिपटीने वाढले आहेत. त्यातून तब्बल 1 लाख 40 हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खिशात पोहोचल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
आपल्या जीडीपीत कृषी क्षेत्राचा वाटा 12 टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचे 22 ते 24 आणि सेवा क्षेत्राचा वाटा 52 ते 54 टक्के इतका आहे. कृषी क्षेत्राचा वाटा 12 वरून 22 न्यावा लागणार आहे. त्यातून स्मार्ट व्हिलेज तयार होतील. त्यासाठी भविष्यातील विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना महामार्गांच्या उभारणीसाठी भांडवली बाजारातून पैसा उभा केला. त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिथे सहाशे कोटींचा निधी उभारला जाईल वाटले होते, तिथे बाराशे कोटी उभे राहात होते. प्रकल्पांसाठी बाजारातून पैसा उभा केल्यामुळे, तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार निघालात, असे मला तेव्हा रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी म्हणाले होते. महामार्गासाठी अशा पद्धतीने पैसे उभारल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सिंचन प्रकल्पांसाठीही असा पैसा उभारता येईल का, अशी विचारणा केली. त्यातून पुढे राज्यात पाच वेगवेगळ्या विकास महामंडळांची स्थापना झाली.
कृषी क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलेजन्स येत आहे. पिकांना पाणी देण्यापासून कधी आणि किती खत वगैरे द्यायचे ते यातून कळणार आहे. एका एकरात 180 टन उसाचे उत्पादन घेण्याची क्षमता यातून निर्माण होणार आहे. एकीकडे खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार आहे. एका अर्थाने या कृषी तंत्रज्ञानाचे माहेरघरच महाराष्ट्र आहे. शेतकरी आपला आता केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे.
1952 साली आपल्या देशातील गीर गाय ब्राझीलला गेली. त्यावर संशोधन झाले आणि आता 60 लिटर दूध देणार्या गायी तिथे आहेत. त्या गीर गायींचा जो टोरेंडो नावाचा सांड आहे त्याच्या रेतनानंतर आलेल्या गायींची क्षमता 12-14 लिटर दूध देण्याची झाली आहे. त्यामुळे गायींसाठी बेटी बचावची गरज नाही. शंभर टक्के गीर गाईच होणार, तसे तंत्रज्ञान आले आहे. आपण जर हे केले तर भविषयात विदेशी गायीसुद्धा देशी बनतील. यासाठीचे देशात जे तीन प्रकल्प आहेत त्या तिन्ही महाराष्ट्रात आहेत. सांगलीला चितळे, बारामतीत शरद पवार आणि नागपूरात मी स्वतः व्हेटर्नरी यंत्रणा उभारली आहे. यातून दुधाच्या क्षेत्रातील क्रांती महाराष्ट्राचे चित्र बदलेल, असेही नितीन गडकरी म्हणाले.
सुंदर रस्त्यांमुळे प्रयागराजमधील कुंभमेळ्याचा पसारा वाढल्याचे एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. चांगल्या रस्त्यांमुळे लोकांनी जुन्या गाड्या विकत घेतल्या आणि कुटुंबांसह प्रयागला आले. त्यामुळे रस्ते विकासाचा पसारा वाढवतात. राज्यातील रस्त्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रातील रस्ते अमेरिकेपेक्षा सुंदर होतील आणि हे एक वर्षात घडेल, असेही गडकरी म्हणाले.
जिल्हा वृत्तपत्र म्हणून 1939 साली दैनिक ‘पुढारी’चा प्रवास सुरू झाला. आज विविध जिल्ह्यांतील 25 आवृत्त्यांच्या माध्यमातून एक कोटींहून अधिक वाचक ‘पुढारी’शी जोडले गेले. केवळ वृत्तपत्रच नव्हे तर आज डिजिटल मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन, इव्हेंट, आऊटडोअर अशा सर्व माध्यम प्रकारांत ‘पुढारी’ आहे. कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय ‘पुढारी’ने स्वतःला सिद्ध केले आहे. ‘पुढारी’ वृत्तपत्राने 87 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. या प्रवासात आज ‘पुढारी’चे वर्णन करायचे झाल्यास ‘360 डिग्री मीडिया हाऊस’ असे करावे लागेल. भविष्यात नवीन तंत्रज्ञानामुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे माध्यमांचे स्वरूप आणखी बदलेल. नवे आयाम त्यात जोडले जातील. त्या बदलत्या माध्यम जगतातही ‘पुढारी’ ठामपणे असेल, अशा शब्दांत दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात विशद केले.
‘पुढारी न्यूज’मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा ‘पुढारी’ची हीच परंपरा आणि विश्वास चॅनेलमध्ये आणू शकलो. एआयच्या काळातही ही विश्वासार्हता महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच व्हिडीओच्या क्षेत्रातही एक विंग ‘पुढारी’ने सक्षमपणे उभी केली आहे. निर्भीड आणि निष्पक्ष ही ओळख आम्ही चॅनेलमध्ये कायम ठेवली आहे. त्यामुळे भविष्यातील आमचा पुढचा प्रवासही खणखणीत असेल, असा विश्वास डॉ. योगेश जाधव यांनी व्यक्त केला.