

मुंबई: अमेरिका-इराण युद्धामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेला तणाव, होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, यामुळे अनिश्चितता निर्माण झाली.
परिणामी, एप्रिल ते जून या तिमाहीत दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह सात शहरांतील घरांची विक्री गत वर्षीच्या तुलनेत १ लाख २ हजार ६७५ वरून ९०,७१५ वर (सहा टक्के घट) घसरली आहे. मात्र, याच कालावधीतील नवीन घरांचा पुरवठा सात टक्क्यांनी वाढून १ लाख ६ हजारांवर गेला आहे.
दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) विक्री झालेल्या एकूण घरांमध्ये मुंबई महानगरचा (एमएमआर) वाटा ४८ आहे. तब्बल ४३,९९५ घरे या दोन शहरांत विकली गेली आहेत. कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांमधील घरांची विक्री अनुक्रमे १०, २ आणि १ टक्क्याने वाढली आहे. सात शहरांतील घरांची विक्री गत वर्षीच्या तुलनेत ९६,२८५ वरून ९०,७१५ वर घसरली आहे. तर, जानेवारी ते मार्च २०२६च्या तुलनेत ११ टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे.
मुंबई महानगरामधील घरांची विक्री १४,२५५ वरून १३,३६५ वर (सहा टक्के) घसरली आहे. पुण्यातील घरांची विक्री १५ टक्क्यांनी घटून १३ हजार ९० वर आली आहे.
नवी दिल्लीतील घरांची विक्री १४,२५५ वरून १३,३६५ आणि चेन्नईतील घरांची विक्री ९ टक्क्यांनी घटून ५,१३५ वर आली आहे. हैदराबाद येथील घरांची विक्री दोन टक्क्यांनी वाढून ११,२७० आणि कोलकाता येथील विक्री १० टक्क्यांनी वाढून ३,८६० वर आली आहे.
मुंबई महानगरासह सात मोठ्या शहरांमध्ये एप्रिल ते जूनच्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा ९८,६२५ वरून १ लाख ६ हजारांवर गेला आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांचा नवीन घरांच्या पुरवठ्यात ८१ टक्के वाटा आहे.
मुंबईतील घरांचा वाटा २३ टक्क्यांनी वाढून ३४,५५५ वर गेला आहे. पुण्यातील घरांचा पुरवठा १४,२२० वरून १२,७३५ वर घसरला आहे. मुंबईतील नवीन घरांच्या पुरवठ्यात ५७ टक्के घरे दीड कोटी रुपये श्रेणीतील आहे.
शिल्लक घरांची संख्या वाढली...
एप्रिल ते जूनच्या तिमाहीत घरांची विक्री मंदावल्याने दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह सात शहरांतील शिल्लक घरांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत ५.६२ वरून ६.१६ लाखांवर वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत शिल्लक घरांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली आहे. बेंगळुरूमधील शिल्लक घरांची संख्या सर्वाधिक ५८,८९० वरून ७९,१८०वर वाढली आहे.