Raigad news| देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईमध्ये उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Navi Mumbai Entertainment Arena | नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सार्थ अभिमान असल्याचे सिडकोने म्हटले आहे
Raigad news
Raigad news
Published on
Updated on

पनवेल

विक्रम बाबर : दूरदर्शी नियोजनाद्वारे व विशिष्ट उद्देशाने विकसित करण्यात आलेले नवी मुंबई हे देशाच्या नगर नियोजनाला नवीन दिशा देणारे शहर ठरले आहे. भविष्यातील शहर म्हणून संकल्पित असलेली नवी मुंबई वर्तमानातील शहर म्हणून दिमाखाने झळकत आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासह देशातील थेट करमणूक क्रांती (live entertainment revolution) चा केंद्रबिंदू म्हणून नवी मुंबईला नावारूपाला आणत असल्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणून देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईमध्ये उभारण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती जारी करून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वारस्य अभिव्यक्ती दस्तऐवज 9 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन उपलब्ध असणार असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळ) आहे.

न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्व्केअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या बहुउद्देशीय नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प देशातील करमणूक पायाभूत सुविधांमध्ये नवीन मानदंड प्रस्थापित करणार आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव (immersive productions) यांच्या आयोजनाकरिता 20,000 प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि 25,000 उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे.

नवी मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत वेगाने होत असल्याने जागतिक पातळीवरील करमणूक कार्यक्रमांचे यजमानपद भूषवण्यासाठी नवी मुंबई सक्षम झाली आहे :

•     अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हाय स्पीड रेल्वे मार्ग आणि नवी मुंबई मेट्रो यांद्वारे अखंड आणि वेगवान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली आहे.

•     नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे करमणूक व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स), आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांकरिता परिवहन आणि प्रसार माध्यम उत्पादन क्षमता यांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडून येणार आहे.

•     नेरूळ जेट्टीद्वारे पर्यटन, जलवाहतूक आणि चित्रपट निर्मितीच्या संधींमध्ये वाढ होणार आहे.

•     फिफा मानकांचे अनुपालन करणाऱ्या चार खेळपट्ट्या आणि 4,000 आसन क्षमतेचे स्टेडियम असणारे खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स आणि 18 होल्सचे खारघर व्हॅली गोल्फ कोर्स यांनी नवी मुंबईचे क्रीडा व करमणूक क्षेत्रातील स्थान अधिक बळकट केले आहे.

•     आगामी मेडि सिटी, एज्यु सिटी आणि एरो सिटी प्रकल्पांद्वारे नवी मुंबईचे एकात्मीक नगर विकास प्रारूप अधिक उठावदार होणार आहे.

उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित हितसंबधींसोबत (Stakeholders) भागीदारी करून जागतिक दर्जाचे ज्ञान व परिचालन क्षमता आणून देशातील करमणूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. हा उपक्रम केवळ अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, पर्यटनाला चालना, नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होणार असून देशातील थेट करमणूक, जागतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभव प्रदान करणारे अग्रणी शहर म्हणून नवी मुंबईचे देशामध्ये स्थान निर्माण होणार आहे.

या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून कल्पनांना मूर्त रूप देण्याकरिता सिडकोची असलेली कटिबद्धता अधोरेखित होत आहे व देशाची थेट करमणुकीची राजधानी म्हणून नवी मुंबईचे स्थान बळकट होत आहे.

“नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारणीसाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांकरिता खुली होऊन कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत व नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी असलेली सिडकोची कटिबद्धता अधोरेखित होत आहे.”

विजय सिंघल , उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news