भारताची फिनटेक विविधता पाहून जग आश्चर्यचकित : PM मोदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : एक काळ असा होता की, जेव्हा लोक आमची सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्यचकित व्हायचे. आता लोक भारतात येतात आणि आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्यचकित होतात. विमानतळावर उतरल्यानंतर स्ट्रीट फूडपासून शॉपिंगपर्यंत आता भारताची फिनटेक क्रांती सर्वत्र दिसून येते, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.३०) केले. ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. (Modi Maharashtra Visit)
फिनटेक क्रांतीमुळे आर्थिक सुधारणेसोबतच नवनिर्मितीला प्रोत्साहन
पीएम मोदी म्हणाले की, फिनटेकच्या बाबतीत भारताची विविधता पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. पूर्वी संसदेत लोक माझ्यासारख्या चायवाल्याला विचारायचे की, देशात बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत, खेड्यापाड्यात बँका उपलब्ध नाहीत, इंटरनेट सेवा उपलब्ध नाहीत. फिनटेक क्रांती कशी येईल?, आता एका दशकात ब्रॉडबँड वापरकर्ते 60 दशलक्ष (6 कोटी) वरून 940 (94 कोटी) दशलक्ष झाले आहेत. त्यामुळे फिनटेक क्रांती आर्थिक सुधारणेसोबतच नवनिर्मितीला प्रोत्साहन देत आहे. (Modi Maharashtra Visit)
भारताचा UPI संपूर्ण जगात फिनटेकचे एक मोठे उदाहरण बनले आहे. आज गाव असो वा शहर, हिवाळा असो वा उन्हाळा, पाऊस असो किंवा बर्फवृष्टी असो, भारतात बँकिंग सेवा २४ तास, सात दिवस आणि १२ महिने सुरू असते.
पीएम मोदी म्हणाले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच जन धन योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही जन-धन खाती महिला सक्षमीकरणासाठी एक उत्तम माध्यम बनली आहेत. याअंतर्गत 29 कोटींहून अधिक महिलांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमुळे महिलांसाठी बचत आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. या खात्यांवर आधारित, आम्ही सर्वात मोठी सूक्ष्म वित्त योजना मुद्रा योजना सुरू केली. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 70 टक्के महिला आहेत.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)