

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या दशकात भारतातील सेमीकंडक्टर उद्योग बलाढ्य चिप निर्मात्या देशांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. या उद्योगाला आघाडीवर नेण्यासाठी 10 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन योजनेचे बळ दिले जात असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. सिंगापूर येथे आयोजित ब्लूमबर्ग न्यूज इकोनॉमी फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशाच्या सेमीकंडक्टर निर्मिती योजनेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने दहा अब्ज डॉलरची प्रोत्साहन योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत मोठे उत्पादन प्रकल्प, जुळणी आणि आरेखन (डिझाइन) क्षमता निर्माण केली जाणार आहे. भारत अमेरिका, चीनसह चिप निर्मितीत आघाडीवर असणार्या देशांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
सेमीकंडक्टर निर्मितीत आता आघाडीवर असलेल्या देशांच्या बरोबरीने भारतातील उद्योग 2031-32 पर्यंत उभा राहील. त्यानंतर स्पर्धेसाठी समान स्थिती उपलब्ध असेल. भारताची सेमीकंडक्टर धोरण अवघ्या तीन वर्षांचे आहे. त्या कालावधीतही आपण जागतिक गुंतवणूक वळविण्यात यश मिळविले आहे. इतक्या कमी कालावधीत सेमीकंडक्टरची परिसंस्था निर्माण कली आहे, असे ते म्हणाले.मायक्रॉन टेक्नोलॉजीने गुजरातमध्ये चाचणी आणि पॅकेजिंग प्रकल्प सुरू केला असून, टाटा समूह सिलिकॉन फॅबि—केशन प्रकल्प सुरू करत आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीस तीन प्रकल्पातून व्यावसायिकदृष्ट्या चिप उत्पादन सुरू होईल, असे वैष्णव म्हणाले.