

पुढारी ऑनलाईन डेस्क : Disha Salian death case | पाच वर्षानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी रिट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांनी या प्रकरणात 'मला मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला होता', असा दावा केला आहे. ते (दि.२२) आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी मला दोन फोन केले होते. दिशा सालियन घटना घडली, तेव्हा मला मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला होता. नार्वेकर म्हणाले होते की, "दादा साहेबाना बोलायचं आहे". त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेतला आणि म्हणाले होते की, "तुम्हाला मुले आहेत मलादेखील आहेत. आदित्य ठाकरेंचा उल्लेख करू नका, अशी विनंती करतो. यानंतर मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो, "मी तुमच्या मुलाचे नाव घेतले नाही. तुम्ही प्रेस घेताना उल्लेख टाळाल तर बरे होईल".
अनिल परब यांनी बढाया मारू नयेत. अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण दिसते का? अनिल परब वकील असल्याने बोलत असतो. शिवसेनेत कोण राहिले आहेत, अशी टीकादेखील राणे यांनी अनिल परब यांच्यावर केली. जे प्रकार घडले ते प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्यावेळच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा सालियन कुटुंबावर दबाव होता? त्यामुळे पोलिसांनी त्वरित एफआयआर का दाखल केली नाही? पोलिस पेडणेकरांना का अटक करत नाहीत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे.