कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून तिथे बेकायदा झोपड्या व पक्क्या इमारतींचे पेव फुटले आहे. 10 वर्षांपासून खाडीकिनारी खारफुटींवर रॅबिट वा मातीचे ढिगारे टाकून तिथे झोपड्या उभारल्या जात आहेत. दिवसेंदिवस वाढणार्या बेकायदा बांधकामांकडे तहसीलदार, वनखाते आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नद्यांचे नाले झाले असून हे नाले अधिकाधिक अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे नद्या पुनर्जीवित होणार तरी कशा, असा जटील प्रश्न पर्यावरणप्रेमींसह सतर्क नागरिकांना भेडसावत आहे.
चारकोप आणि गोराईतील जवळपास 40 हेक्टर परिसर खारफुटीच्या वनांनी व्यापला आहे. वनविभागाने संपूर्ण जागा संरक्षित वनविभाग असल्याचे फलकही लावले आहेत. गोराई ते दहिसरपर्यंत जवळपास 80 हेक्टर परिसरात खारफुटी आहे. चारकोप गाव, गोराई खाडी, एमएचबी कॉलनी परिसर, एक्सर, धर्मानगर आणि गणपत पाटीलनगर परिसरातील खारफुटीवर व दलदलीच्या भागात रात्री डेब्रिज टाकले जाते. त्याखाली खारफुटी गाडल्या जातात. चारकोप-गोराई जोडणार्या खाडीपुलाच्या बाजूलाही अशाच प्रकारे नाल्यात घरे उभी राहिली आहेत.
बेकायदा बांधकामावर महापालिका, तहसीलदार, पोलिस खाते आणि वनखात्याकडून कारवाई होत नाही. तक्रारदारांची नावे स्थानिक गुंडांपर्यंत पोहोचत असल्याने तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
मिठी, दहिसर, पोईसर या नद्यांचे नाले झाले आहेत. या नदी-नाल्यांना संरक्षक भिंती नसल्याने, त्या अनधिकृत बांधकामात अरुंद होत आहेत. नद्यांना पुनर्जीवीत करण्यासाठी अनेक वर्षे रिव्हर मार्च (रॅली) निघाल्या. परंतु अजूनही याकडे सरकारचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लक्ष नाहीच. संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि संरक्षण भिंत बांधावी. तरच नद्या वाचतील आणि त्या पुनर्जीवीत करता येईल, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.