

मुंबई : मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईत निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीवर आता आयआयटी मुंबई आणि सेप्ट विद्यापीठ यांनी एकत्रितपणे तोडगा शोधला आहे. उंच इमारतींच्या गच्चीत आणि छतांवर झाडे लावल्याने पुराचा धोका टळू शकतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या अनेक नव्या जागा तयार झाल्या आहेत. दाट लोकवस्तीच्या मोठ्या शहरांमध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते, काँक्रिटची अंगणे असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे अतिवृष्टी झाली की, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी सखल भागात जाऊन साचते. पाण्याचा निचरा करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, रेन गार्डन (सखल भागात उद्यान तयार करून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करणे), हरित छते असे काही शाश्वत पर्याय आहेत. यापैकी हरित छते हा पर्याय व्यवहार्य आहे का, याबाबत आयआयटी मुंबईचे प्रा. प्रदीप काळबर, प्रा. अर्पिता मंडल आणि अहमदाबादच्या सेप्ट विद्यापीठाचे अध्यापक प्रा. तुषार बोस यांनी संशोधन केले.
जर्नल ऑफ एन्वायर्नमेंटल मॅनेजमेंटमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला असून भारत सरकारच्या विज्ञान आणि शिक्षण संशोधन मंडळाचा निधीही त्यांना मिळाला. अशी हरित छते पावसाळ्यात पुरापासून आणि उन्हाळ्यात उष्म्यापासून संरक्षण देतील, असे यात म्हटले आहे.
इमारतींच्या छतांवर एका वॉटरप्रुप पडद्यावर मातीचा एक उथळ थर तयार करून त्यात झाडे लावण्याचा विचार आहे. त्यासाठी जलनिःसारण उपाययोजना करून हरित छते तयार केली जातात. उन्हाळ्यात ही हरित छते इमारत थंड ठेवतात आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी शोषून घेतात. हे शोषलेले पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने पुन्हा साठवता येते. हरित छत तयार करण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो आणि इमारतीवर भार वाढतो.