

मुंबई: आयआयटी मुंबईने अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सुनी) ओल्ड वेस्टबरी सोबत करार करत अमेरिकेतील उच्च शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड कॅम्पसमध्ये आयआयटी मुंबईने भागीदारीतून विज्ञान, अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन शैक्षणिक कार्यक्रम आणि संयुक्त संशोधन विकसित करण्यात येणार आहे.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि सुनी ओल्ड वेस्टबरीचे अध्यक्ष डॉ. टिमोथी ई. सॅम्स यांनी हेतुपत्रावर शुक्रवारी झालेल्या आभासी बैठकीत स्वाक्षऱ्या केल्या.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्र सरकारचे उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीत जोशी, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्यदूत बिनय एस. प्रधान यांच्या उपस्थितीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली.
या सहकार्याअंतर्गत विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन स्तरावरील नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधनालाही चालना दिली जाणार आहे. तसेच दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक आणि संशोधकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, परिषद आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी दोन्ही संस्थांची बलस्थाने परस्परपूरक असल्याने ही भागीदारी भविष्यात मोठ्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तर सुनी ओल्ड वेस्टबरीचे अध्यक्ष डॉ. टिमोथी ई. सॅम्स यांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये आयआयटी मुंबईची भक्कम शैक्षणिक उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही भागीदारी भारत-अमेरिकेदरम्यानच्या ज्ञान सहकार्याचा नवा टप्पा असल्याचे सांगत, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांसाठी ती लाभदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीत जोशी यांनीही भारत-अमेरिका उच्च शिक्षण व संशोधन सहकार्याच्या दृष्टीने ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद केले.