मुंबई : “पूरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या इमारती दाखवा किंवा सिंचनवाहिनीजवळ कोरडे पडलेली शेती कुठे आहे?” असे प्रश्न थेट विचारले आणि उपग्रह प्रतिमेतून लगेच उत्तर मिळाले, तर हे आता शक्य झाले आहे. मुंबई आयआयटीने विकसित केलेले ‘अॅडॅप्टिव्ह मोडॅलिटी-गाईडेड व्हिज्युअल ग्राऊंडिंग’ हे नवे मॉडेल असून बोली भाषा समजून घेत प्रतिमेत हवे ते दाखवण्याची क्षमता या प्रणालीत आहे.
आजवर संशोधनातून उपग्रह वा ड्रोनमधून मिळणार्या प्रतिमांमध्ये तपशीलांची गर्दी असते. धूर, धूळ, इमारतींचे आकार वा सावल्या यामुळे वस्तू ओळखणे अवघड होते. अत्याधुनिक एआय मॉडेल्ससुद्धा यामध्ये अनेकदा अपयशी ठरतात. पण आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी या मर्यादांवर मात केली आहे.
प्रा. बिप्लब बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शबनम चौधुरी आणि प्रथाम कुर्कुरे यांनी हे संशोधन साकारले. दूरवरून घेतलेल्या प्रतिमा संगणकासाठी गुंतागुंतीच्या असतात. माणूस सहज ओळखतो, पण यंत्र गोंधळून जाते. अॅडॅप्टिव्ह मोडॅलिटी-गाईडेड व्हिज्युअल ग्राऊंडिंग ही प्रणाली त्या गोंधळाला छेद देत थेट प्रश्नाला अचूक उत्तर देणार आहे, असे संशोधक शबनम चौधुरी यांनी सांगितले.
या मॉडेलचे उपयोग अनेक क्षेत्रात दिसून येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनात पूर वा भूकंपानंतर नुकसान झालेल्या इमारती त्वरित शोधता येतील. शेतीत पिकांचे नुकसान प्रत्यक्ष वेळेत समजेल. नागरी नियोजनात रस्ते वा पूल तपासणे सोपे होईल.
अगदी लष्करी निरीक्षणासाठीही हे तंत्रज्ञान हाताशी घेता येणार आहे. संशोधनाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आयआयटी मुंबईने हे मॉडेल मुक्त-स्रोत (ओपन सोर्स) स्वरूपात सार्वजनिक केले आहे. त्यामुळे जगभरातील संस्था व संशोधक ते विनामूल्य वापरू शकतात.
संशोधन केवळ एका गटापुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी खुले असावे, ही आमची भूमिका आहे, असेही चौधुरी यांनी सांगितले आहे. तसेच बोली भाषा आणि यंत्राच्या क्षमतेतला दुवा साधणारे हे मॉडेल दूरस्थ संवेदनाच्या जगात मोठी झेप असल्याचेही त्या म्हणाल्या.
उपग्रह प्रतिमेतून बोली भाषेत दिलेल्या सूचनांनुसार अचूक तपशील शोधणारे देशातील पहिले नवे मॉडेल आहे, पूर, भूकंप, वणवा यांसारख्या आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त भाग शोधणे; शेती, नागरी नियोजन आणि लष्करी सर्व्हेलन्ससाठीही उपयुक्त असणार आहे. मानवी भाषेतील साधा प्रश्न समजून संगणक उपग्रह प्रतिमेतून थेट योग्य ठिकाण दाखवतो, गोंधळ टाळता येणार आहे. सेन्सर-अवेअर आवृत्ती, संरचनात्मक ग्राऊंडिंग आणि मोठ्या भाषा मॉडेल्सच्या साहाय्याने पुढील प्रगती साधण्याची संशोधकांची तयारी असल्याचेही आयआयटीकडून सांगण्यात आले.