IAS recruitment reforms : थेट ‘आयएएस’ प्रवेश निकष बदलले; नापासांचा कारनामा?

शासन निर्णय वादात : मंत्रालयातील नाराज उपसचिव ‘मॅट’कडे जाणार
IAS recruitment reforms
मंत्रालयpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकार्‍यांना निवडीने नियुक्ती देण्यासाठी जारी झालेल्या नव्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिव संतापले असून याविरोधात ‘मॅट’मध्ये जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकार्‍यांसाठी ‘आयएएस’च्या 5 टक्के जागा राखीव असतात. यामध्ये मंत्रालयातील उपसचिव, सहसचिव, अवर सचिव यांचा समावेश आहे. यावेळी ‘आयएएस’च्या तीन जागा असून त्यासाठी 280 पात्र अधिकारी आहेत. परीक्षा घेऊन एकास पाच अधिकार्‍यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जाते. त्यातून ‘आयएएस’ अधिकार्‍यांची निवड होते. थेट आयएएस केडर मिळण्यासाठी मागील वेळी 100 गुणांची ‘आयबीपीएस’ मार्फत परिक्षा घेण्यात आली होती. यंदा मात्र हे गुणांचे निकषच बदलले आहेत.

60 गुण लेखी परिक्षा,20 गुण सेवा कालावधी आणि 20 गुण गोपनिय अहवालासाठी आहेत. सेवा कालावधीच्या 20 गुणांमध्ये ज्याची सेवा अधिक त्याला अधिक गुण हा नवा निकष घुसवला गेला आहे. या निकषाचा तरुण उपसचिवांना फटका बसणार असून अधिक सेवा झालेले सहसचिव, अवर सचिव यांना साहजिकच अधिक गुण मिळणार आहेत.

बिगर नागरी राज्य सेवेतून आयएएस निवडीसाठी किमान 8 वर्षे सेवेची अट होती. यावेळी 8 वर्षे सेवा कालावधीला 5 गुण आणि त्यापुढच्या प्रत्येक वर्षाच्या सेवेला अधिकचा गुण दिला जाणार आहे. ज्याची 23 वर्षे सेवा झाली त्याला पूर्ण 20 गुण मिळणार आहेत. सेवाज्येष्ठ अधिकार्‍यांना नव्या निकषांचा लाभ होईल, अशी खंत अनेक उपसचिवांनी व्यक्त केली आहे.

या निकषांना मंत्रालयातील उपसचिवांनी विरोध केला असून, अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले दिले आहे. शासन निर्णयातील नवे निकष भारतीय प्रशासकीय सेवा निवडीने नियुक्ती विनियम 1997 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहेत. हे नवे निकष सेवा कालावधीला अधिक महत्व देणारे असून गुणवत्तेला मारक ठरणारे आहेत. नव्या निकषांमुळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 4 (समतेचा हक्क) आणि अनुच्छेद 16 (सार्वजनिक रोजगाराची समान संधी) चे उल्लंघन होत आहे, याकडे उपसचिवांनी आपल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.

  • नवे निकष तयार करण्यात मुख्यमंत्री कार्यालयातील एक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील एक आणि सामान्य प्रशासन विभागातील एक अशा तीन सेवाज्येष्ठ अधिकार्‍यांचा हात असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. विशेष म्हणजे, हे अधिकारी मागच्या वेळी थेट आयएएस केडरसाठीच्या लेखी परीक्षेमध्ये नापास झाले होते. यावेळी सेवाज्येष्ठतेच्या निकषावर आपोआप जास्त गुण मिळवून आयएएस होण्यासाठी त्यांनीच हा नव्या निकषांचा कारनामा घडवला, असा जबरदस्त संशय व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news