

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादातून राममनोहर नामपिल्ले या 65 वर्षांच्या पतीने 55 वर्षांच्या लता नामपिल्ले या आपल्या पत्नीची हत्या करून स्वत:लाही संपविल्याची घटना रविवारी सकाळी वरळी परिसरात घडली.
राममनोहर हा त्याची पत्नी लता, मुलगा आणि सुनेसोबत वरळीतील सिद्धार्थ नगर, पंकज मेन्शन इमारतीमध्ये राहात होते. कतार येथे इलेक्ट्रिशियन म्हणून निवृत्त झाले होते. डिसेंबर 2023 साली त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. लग्नानंतर मुलाने स्वतंत्र राहावे, स्वत:ची प्रगती करावी, चांगली नोकरी मिळवावी, असे त्यांना सतत वाटत होते. मात्र त्यांच्या पत्नीचा त्यास विरोध होता. त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत राहावे असे तिला वाटत होते. याच कारणावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते.
शनिवारी जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या बेडरूममध्ये,तर त्यांचा मुलगा दुसर्या बेडरूममध्ये झोपला होता. सकाळी साडेपाच वाजता ते झोपेतून उठले आणि त्यांनी त्यांच्या गावठी कट्ट्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली होती.
त्यानंतर ते इमारतीच्या जिन्याजवळ आले आणि त्यांनी जिन्यावर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या मुलासह भाच्याला समजताच त्यांनी वरळी पोलिसांना ही माहिती दिली होती. या दोघांनाही तातडीने जवळच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी त्यांच्या मुलासह भाच्याची पोलिसांनी जबानी नोंदविली होती. या जबानीनंतर राममनोहरविरुद्ध पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यांतील गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून हा कट्टा त्यांना कोणी दिला याचा पोलीस तपास करत आहेत.