

हार्बर मार्गावरील सानपाडा स्थानकातून रात्री १२ वाजून ०४ मिनिटांनी सुटणाऱ्या वडाळा लोकलच्या डब्यांमध्ये मानवी विष्ठा पुसून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. फर्स्ट क्लाससह इतर डब्यांमधील आसनांवर मानवी विष्ठा लावण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकारामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
सानपाडा स्थानकात सदर लोकल येताच प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी गाडीत धाव घेतली, मात्र फर्स्ट क्लासच्या डब्यातील सर्व आसनांवर मानवी विष्ठा पुसण्यात आली होती. काही प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली, ते सावध झाले. मात्र अनेक प्रवासी तशाच आसनांवर जाऊन बसले. यावेळी अंगाला मानवी विष्ठा लागल्यामुळे अनेकांनी मळमळ होत असल्याचे यावेळी सांगितले.
लोकलच्या डब्यातील हा संतापजनक प्रकार पाहताच काही प्रवाशांनी धावत जाऊन दुसरा डबा पकडला, तर त्या डब्यातही तसाच प्रकार दिसून आला. यामुळे ठरवून हा प्रकार केला असण्याची शक्यता अनेकांनी बोलून दाखवली. अलीकडच्या काळात असे प्रकार वाढल्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र रेल्वे प्रशासन असे प्रकार रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे यावेळी प्रवाशांनी सांगितले.
सानपाडा स्थानकात कबुतरे, कुत्रे, मांजरींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या वेळी अनेक लोक फलाटवरच कबुतरांना दाणे टाकतात. कुत्रे, मांजरींनाही खाऊ घालणारे फलाटावरच अन्न फेकून अस्वच्छता पसरवतात. अशा प्राणिप्रेमींवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सानपाडा स्थानकात लावण्यात आलेले पंखे रात्री दहा वाजताच बंद केले जातात. त्यामुळे प्रवाशांना गर्मी सहन करत लोकलची वाट पाहावी लागते. दुसरीकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक पंखा चालू ठेवला जातो. त्यामुळे सानपाडा स्थानकात लावलेले पंखे नेमके कोणासाठी लावलेले आहेत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
फर्स्ट क्लासचे तिकीट काढूनही अशा घाणीतून प्रवास करावा लागतो. त्यातच फर्स्ट क्लासमध्ये होणारी घुसखोरीसुद्धा चितेंचा विषय असल्याचे अनेकांनी सांगितले. सकाळच्या वेळी तर या डब्यांमध्ये अनेकजण झोपून प्रवास करताना दिसून येतात. त्यामुळे इतरांना बसायलाही जागा मिळत नाही.