Tender scam : हॉटेल वीट्स निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा; विरोधी पक्षांची सभागृहात आक्रमक भूमिका
Tender scam
हॉटेल वीट्स निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल वीट्सची वादात सापडलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता नव्याने प्रक्रिया करण्यात येणार आहे. परंतु, अशा प्रकरणात पारदर्शीपणा असला पाहिजे, यासाठी हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतील अटी, शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली का, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

दरम्यान, मे. सिद्धांत मटेरियल आणि सप्लायर्स कंपनी नोंदणीकृत नसताना आणि इन्कम टॅक्स भरल्याचा कोणताही पुरावा नसताना याच कंपनीला निविदा कशी मंजूर होते, असा सवाल करत शासनाची फसवणूक करणार्‍या या कंपनीची आणि अधिकार्‍यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील वीट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शीपणाचा अभाव असल्याचा आरोप करत मंत्री संजय शिरसाट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जाहिरातीनुसार मे. सिद्धांत मटेरियल आणि सप्लायर्स कंपनी, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम कंपनी, कल्याण टोल इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अशा तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 2025 मध्ये हॉटेलचा लिलाव करताना 2018 च्या मूल्यांकनाच्या अहवालानुसार मूल्यमापन करीत असल्याचे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

2018 च्या मूल्यमापनानुसार हॉटेलचे वाजवी बाजारमूल्य 75.92 कोटी व प्राप्त करण्यायोग्य मूल्य 64.53 कोटी होते, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. परंतु, आम्ही खासगी मूल्यांकनाकडून माहिती घेतली असता या हॉटेलची किंमत जवळपास 150 कोटी आहे. त्यामुळे आताच्या बाजारभावानुसार लिलाव करताना त्या संपत्तीचे मूल्यमापन का केले नाही, असा सवाल करत येथे काम करणार्‍या 150 कर्मचार्‍यांना कोणतीही नोटीस दिली नसल्याचे सांगितले.

लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतलेली सिद्धांत कंपनी ही नोंदणीकृत कंपनी नसून, ती 75 कोटी रुपयांसाठी टेंडर भरते. या कंपनीने 2024 मध्ये नोंदणीसाठी अर्ज केलेला असताना आणि तीन वर्षांचा आयकर भरलेला नसताना या कंपनीला टेंडर कसे मंजूर झाले. कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून, त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्या वडिलांच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलगा सिद्धांतच्या नावावर एकही रुपयाची संपत्ती नसल्याचे म्हटले आहे; मग त्याच्या नावावर 65 कोटी रुपयांची निविदा कशी भरली, इतके पैसे आले कुठून, असा सवाल करत सहभाग घेतलेल्या कंपन्यांनी भरलेल्या टेंडरच्या रकमेत अवघ्या पाच-पाच कोटी रुपयांचा फरक आहे. \

शासनाची ही फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. या प्रश्नाच्या चर्चेत ठाकरे गटाचे अ‍ॅड. अनिल परब, काँग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेत सरकारला जाब विचारला.

गुंतवणूकदारांना पैसे मिळणार

विरोधी पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हॉटेल वीट्सची निविदा प्रक्रिया रद्द केली असल्याचे सांगितले. सरकारने 2018 ते 2025 या काळामध्ये ताज्या मूल्यानुसार सहा वेळा निविदा काढूनही कोणी पुढे आले नाही. एमपीआयडी न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने 2018 च्या मूल्यमापनाच्या आधारावर निविदा काढल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. कोणा एका व्यक्तीसाठी अटी व शर्ती कमी केलेल्या नसून, यामध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नवीन निविदा काढताना नक्कीच काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, धनदा कंपनीने 6,600 गुंतवणूकदारांकडून 13 टक्के व्याजाने 270 कोटी रुपये घेतले आहेत.

ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेला डाव : शिरसाट

विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मंत्री संजय शिरसाट उभे राहिले असता विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला. शिरसाट यांना बोलू देणे नियमात नाही, असा आक्षेप त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे नोंदवला. विरोधकांच्या गोंधळातच शिरसाट यांनी बोलायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने टेंडर काढले गेले आणि किंमत ठरवली गेली, असे सांगत यामध्ये अधिकार्‍यांचा संबंध काय, असा सवाल शिरसाट यांनी केला. विरोधकांना प्रोसेस कळाली नसून, हे दलाली करत आहेत. तुमचा आक्षेप असेल तर कोर्टाच्या समोर जा, असेही त्यांनी सुनावले.

काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेला हा डाव आहे, असा आरोपही शिरसाट यांनी केला. दलाली करण्यापेक्षा माझे ऐकून घ्या, शिवसेनाप्रमुख असते तर यांना जोड्याने मारले असते. मराठी माणूस पुढे गेलेला यांना बघवत नाही, माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे संजय शिरसाट यांनी सभागृहात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news