

मुंबई / पुणे : राज्यात सुमारे ९० हजार होमिओपॅथीचे डॉक्टर नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ २५ हजार डॉक्टरांनी राज्य शासनाचा मान्यता प्राप्त 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांनाच अॅलोपॅथी औषधे देण्याची परवानगी असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने नमूद केले आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (औषध विभाग) राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त (औषधे), सहायक आयुक्त (औषधे) व औषध निरीक्षक यांना जारी केले आहे. होमिओपॅथी डॉक्टरांनाही अॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून संघटनेकडून होत होती. 'सीसीएमपी' अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैद्यक व्यावसायिक या व्याख्येत समाविष्ट आहे. त्याला आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० त्याअंतर्गत नियमानुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषध विक्रेत्यांना औषध देऊ शकतात. तसेच या डॉक्टरांना घाऊक औषध विक्रेते किंवा किरकोळ औषध विक्रेते अॅलोपॅथीच्या औषधांची विक्री करू शकतात, असे या परिपत्रकामध्ये म्हटले आहे. मात्र औषधांची विक्री करण्यापूर्वी या वर त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक व सीसीएमपी ही अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे.
66 राज्यात सध्या ९० हजार होमिओपॅथीचे डॉक्टर असून त्यापैकी २५ हजार जणांनी 'सीसीएमपी' हा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यांना अॅलोपॅथी औषधे देण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेने २०१४ पासून पाठपुरावा केला. आता शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
- डॉ. बाळकृष्ण गायकवाड, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद