

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर अर्ध्या टक्क्याने (50 बेसिस पॉईंट) कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 6) घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यापासून रेपो दरात एका टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे वैयक्तिक, वाहन, गृह कर्जासह इतर सर्व कर्जांच्या व्याज दरात त्याप्रमाणे घट होणार आहे. परिणामी, नागरिकांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे रेपो दर 6 वरून 5.5 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वीच्या दोन पतधोरण समितीच्या बैठकीत प्रत्येकी पाव टक्क्याने रेपो दरात कपात करण्यात आली होती. अवघ्या पाच महिन्यांत कर्ज व्याज दर एका टक्क्याने कमी झाला आहे. महागाई निर्देशांकात झालेली घट आणि खाद्यान्नाच्या किमती आटोक्यात आल्याने रेपो दरात कपात करण्यात आली आहे. रेपो दरात कपात केल्याने कर्ज व्याज दर घटतील. कर्ज स्वस्त झाल्याने देशांतर्गत गुंतवणुकीला चालना मिळेल. देशाच्या अर्थगतीचा वेग कायम राहावा, यासाठीही रेपो दरात कपात करण्यात आली आहे.
आरबीआयने रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) एक टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 6 सप्टेंबर, 4 ऑक्टोबर, 1 आणि 29 नोव्हेंबर 2025 अशा चार टप्प्यांत केली जाईल. प्रत्येक टप्प्यात पाव टक्का सीआरआर घटेल. याचाच अर्थ डिसेंबर 2025 पर्यंत बँकिंग क्षेत्रात अडीच लाख कोटी रुपये येतील. आरबीआयने जानेवारी 2025 महिन्यापासून अर्थव्यवस्थेत विविध माध्यमांतून साडेनऊ लाख कोटी ओतले आहेत. त्यात बँकांकडील डॉलरच्या बदल्यात रुपये हस्तांतरित करण्याचाही समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 6.5 टक्के राहील. त्यात एप्रिल ते जून 6.5, जुलै ते सप्टेंबर 6.7, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 2025 6.6 आणि जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 6.3 टक्के जीडीपी राहील, असा अंदाज आहे.
रेपो दरात अर्धा टक्का कपात करण्यात आल्यामुळे 30 लाख ते एक कोटी रुपयांच्या गृह कर्जावरील मासिक हप्त्यात दोन ते साडेसहा हजार रुपयांची घट होऊ शकते. जर, पन्नास लाख रुपये गृह कर्ज असेल, तर 7.71 लाख रुपयांची बचत होईल. कर्जदारांनी हप्ता कमी करण्याचा निर्णय घेतल्यास मासिक खर्चाचा भार कर्ज रकमेच्या प्रमाणात कमी होतो. उदाहरणार्थ, 30 लाख रुपयांच्या कर्जावर, तुमचा मासिक हप्ता 1,929 रुपयांनी कमी होतो. त्यामुळे एकूण व्याजात 4.63 लाख रुपये वाचवतील. जर, 50 लाख रुपये कर्ज असल्यास हप्ता 3,215 रुपयांनी कमी होतो. त्यामुळे 7.71 लाख रुपयांची व्याज रक्कम वाचते. तर, एक कोटी रुपयांचे कर्ज असेल, तर 6,431 रुपयांनी हप्ता कमी होईल. तर, एकूण व्याज दरात 15.43 लाख रुपयांची व्याजापोटी जाणारी रक्कम वाचेल. काही गृह कर्ज साडेआठ ते नऊ टक्के व्याज दराने आहेत. त्यामुळे नऊ टक्के असलेल्यांचे गृह कर्ज आठ टक्के आणि साडेआठ टक्के असलेल्यांचे गृह कर्ज साडेसात टक्क्यांवर येईल. त्यामुळे त्या प्रमाणात त्यांची बचत आणि बचतीचा कालावधीदेखील बदलणार आहे.