

मुंबई : सुरेखा चोपडे
होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदा होळी १३ मार्च रोजी आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या १३ आणि १४ मार्च रोजी रिग्रेट झाल्या आहेत. यात कोकणकन्या, जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय १२ मार्चचे खासगी ट्रव्हल्सच्या तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे होळी सणानिमित्त कोकणाकरिता जादा गाड्या चालविण्याची घोषणा रेल्वेने लवकरात लवकर करण्याची तसेच एसटी महामंडळानेदेखील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.
मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा १३ मार्च पासून शिमग्याला सुरुवात होत आहे. दरवर्षी होळी सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यातच रेल्वेचे तिकीट दोन महिने आधी आरक्षित करता येते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.
यंदा होळी सण गुरुवारी आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी आधीच रेल्वेची तिकिटे आरक्षित केली आहे. ज्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे मिळाली नाहीत, त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळ आणि रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. परंतु अद्याप रेल्वे आणि एसटी प्रशासनाने विशेष गाड्यांसदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाने लवकरात लवकर जादा गाड्यांची घोषणा करण्याची मागणी चाकरमानी करीत आहेत.