Wankhede Stadium | आज वानखेडेचा सुवर्णमहोत्सव; महान क्रिकेटपटू एकवटणार

लेझर शोने उलगडणार आठवणी
Wankhede Stadium
आज वानखेडेचा सुवर्णमहोत्सवFile photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्तच्या सांगता सोहळ्याद्वारे रविवारी देशभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू एकत्र येतील. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या कार्यक्रमात नेत्रदीपक लेझर शोने आठवणी उलगडल्या जाणार आहेत.

रविवारी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमात विक्रमादित्य सुनील गावस्कर, माजी महान कर्णधार कपिल देव, कर्नल दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार रवी शास्त्री, भारताच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी, विक्रमवीर सचिन तेंडुलकर तसेच अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव असे मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सहभागी होणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री आशीष शेलार, खासदार शरद पवार यांच्यासह मुंबई क्रिकेटचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एमसीएतर्फे कॉफी टेबल बुकचे प्रकाशन तसेच वानखेडे स्टेडियमच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीटाचे अनावरणदेखील केले जाणार आहे. सांगता समारंभादरम्यान, अवधूत गुप्ते आणि अजय-अतुल यांच्या विशेष सादरीकरणांसह नेत्रदीपक लेसर शोही होणार आहे. या शोद्वारे वानखेडेवरील आठवणींना उजाळा मिळेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिरा बेदी आणि प्रसन्न संत करतील.

डझनभर कसोटी, २०११ वनडे आणि २०२४ टी-ट्रेन्टी विश्वविजेतेपद

भारताची वानखेडे स्टेडियमवरील कामगिरी कामगिरी संमिश्र आहे. १९७५ पासून आजवर एकूण २७ कसोटी सामने खेळताना १२ सामन्यात विजय मिळवला आहे. ८ सामन्यात पराभव तर ७ सामने अनिर्णित राहिले. आतापर्यंत २१ वनडे सामने खेळताना १२ जिंकले आणि ९ गमावलेत. पाच टी- ट्रेन्टी सामने खेळताना तीन सामन्यात भारताने विजय मिळवला. २०११ वनडे आणि २०२४ टी-ट्रेन्टी विश्वचषक जेतेपद याच मैदानावर मिळवले आहे.

शेषराव वानखेडे यांचे मोलाचे योगदान

१९७४ मध्ये अस्तिवात आलेले वानखेडे स्टेडियम बांधण्यात बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा मोठा वाटा आहे. वानखेडेपूर्वी, मुंबईतील क्रिकेट सामने हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जायचे. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए (आताचे मुंबई क्रिकेट असोसिएशन - एमसीए) स्टेडियममधील जागा वाटून घेण्यावरून नेहमी वाद व्हायचे. १९७२ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. विदर्भामध्ये जन्मलेले वानखेडे हे क्रिकेटप्रेमी होतेच पण बीसीएचे अध्यक्षही होते, त्यांच्याकडे काही तरूण आमदार बेलिफेट मॅचचा प्रस्ताव घेऊन आले. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्याचे ठरवले. त्यावेळेस सीसीआयचे अध्यक्ष ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चेंट यांनी ही मागणी फेटाळून लावली. शब्दाला शब्द लागला आणि वातावरणही गरम झाले. विजय मर्चेंट यांचा नकार ऐकून वानखेडे म्हणाले, तुम्ही जर अशीच अरेरावी केली तर आम्हाला बीसीएसाठी दुसरे स्टेडिमय उभारावे लागेल. ते बोलून थांबले नाहीत. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले. स्टेडियम बांधण्यासाठी सरकारी तिजोरीत पुरेसा निधी नव्हता. वानखेडे यांनी देणग्या मिळवायला सुरूवात केली आणि फक्त १३ महिन्यात बीसीएने सीसीआयच्या नाकावर टिच्चून नवे स्टेडियम बांधले. वानखेडेंनी घेतलेल्या परिश्रमामुळे स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news