

कांदिवली ः येथील महात्मा गांधी छेद मार्ग दोनवर पालिकेचे आर दक्षिण इमारतीत कार्यालय आहे. या कार्यलयाच्या मार्गांवर लावण्यात आलेले जुन्या इंग्रज बनावटीचे मराठी अंकातील चारही बाजुना वेळ दाखविणारे घड्याळ तीन आठवड्यांपासून बंद होते. पालिकेने घडळ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. याबाबत दै. पुढारीमध्ये 13 जून रोजी ‘टिक टिक थांबली, तीन आठवडे घड्याळ बंद’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत पालिका अधिकार्यांनी ऐतिहासिक घड्याळ सुरु केले.
मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाअंतर्गत पालिकेने लाखो रुपये खर्च करून विजेच्या खांबावर विद्युत नक्षी, ऐतिहासिक खांब, पद पथावर लोखंडी ग्रील्स आणि सिग्नल यांसारखी कामे केली आहे. पालिका कार्यालयाकडे जाणार्या मार्गाच्या सुरुवातीला दुभाजाकांमध्ये चौथारा बांधून, आकर्षक खांबावर चारही दिशेला वेळ पाहता येईन असे, इंग्रज बनावटीचे आकर्षक घड्याळ लावले आहे. बाजूलाच पालिकेचा सरदार वल्लभभाई पटेल तरण तलाव आहे.
वाहनचालक, पादचारी, पालिका कार्यालयात जाणारे नागरिक या घड्याळात वेळ पाहतात. मात्र तीन आठवड्यांपासून घड्याळ बिघडल्याने, नागरिकांमध्ये नाराजी होती. बातमीची दखल घेत पालिकेने घड्याळ सुरु केल्याने प्रवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.