हिंदी भाषासक्तीवरून वाद सुरू असताना, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठीपेक्षा हिंदी भाषक शाळांना जास्त पसंती असल्याचे दिसून आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या हिंदी माध्यमापेक्षा जास्त असली तरी हिंदी माध्यमांमध्ये शिक्षण घेणार्या मुलांची संख्या मराठी भाषक शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपेक्षा दुपटीने जास्त आहे. त्यामुळे कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी दिलेल्या इशार्यामुळे हिंदी भाषासक्तीचा घेतलेला निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. पण मुंबईचा एकूणच विचार केला तर हिंदी भाषा बोलणारे सर्वाधिक आढळून येतात. यात मराठी भाषकांचाही समावेश आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार सांभाळणार्या मुंबई महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळा आहेत. पण या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विशेष म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा ही संख्या दुपटीने जास्त आहे.मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या 262 असून विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 33 हजार 739 इतकी आहे, तर हिंदी माध्यमांच्या शाळांची संख्या 220 म्हणजेच मराठी माध्यमापेक्षा 42 शाळा कमी असताना विद्यार्थ्यांची संख्या 67 हजार 417 इतकी आहे. त्यामुळे साहजिकच मराठी भाषक शिक्षकांपेक्षा हिंदी भाषक शिक्षकांची संख्या दुप्पट आहे.
मराठी माध्यमातील शिक्षकांची संख्या 1 हजार 11 असताना हिंदी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांची संख्या 2 हजार 31 इतकी आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजधानीतच हिंदीमध्ये शिक्षण घेणार्यांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांकडे सामान्य मुंबईकरांचा कल वाढलेला दिसून येत आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या 52 शाळा असून यामध्ये तब्बल 38 हजार 884 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे मराठी माध्यमापेक्षा तब्बल 210 शाळा कमी असताना विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 5 हजारांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय मुंबई पब्लिक स्कूल 80 असून येथे 45 हजार 408 विद्यार्थी शिक्षण घेत असून सीबीएससी, आयसीएसई, केंब्रिज, आयबी या 17 शाळांमध्ये सुमारे 4 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुंबई महापालिका गुजरातीसह तामिळ, तेलगू, कन्नड या माध्यमांच्या शाळा चालवते.पण या माध्यमांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच आहे. मुंबईत गुजराती भाषिक मोठ्या प्रमाणात असताना महापालिकेच्या गुजराती माध्यमांच्या शाळांमध्ये अवघे 1485 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तमिळमध्ये 2736, तर तेलुगू व कन्नडमध्ये अनुक्रमे 422 व 920 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मराठी - 33,739 (शाळा 262)
हिंदी - 67,417 (शाळा 220)
उर्दू - 64,391 (शाळा 188)
विविध इंग्रजी शाळा - 88,295 (शाळा 149)
हिंदी माध्यमातून उर्दू माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकेच्या 188 उर्दू शाळा असून या शाळांमध्ये 64 हजार 391 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी 1 हजार 707 शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थी व शिक्षकांचा हा आकडा बघता, राज्याच्या राजधानीत उर्दूनेही मराठीला मागे टाकल्याचे स्पष्ट होते.